कुकरेजा इन्फिनिटाच्या १८ व्या मजल्यावरून पडून मजूर जखमी
★ या इमारतीची ही दुसरी घटना
नागपूर : सिव्हिल लाईन्स येथे निर्माणाधीन असलेल्या कुकरेजा इन्फिनिटी या इमारतीच्या १८ व्या मजल्यावरून पडून एक मजूर गंभीर जखमी झाला. ही घटना गुरुवारी सायंकाळी ४:४५ वाजता घडली. प्रीतम मेश्राम (वय ३७, रा. बुद्ध नगर, कामठी) असे जखमी मजुराचे नाव आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती समजले जाणारे व नागपूर महानगर पालिकेचे स्थायी समितीचे माझी अध्यक्ष विरेंद्र कुकरेजा यांचे सिव्हिल लाईन्स येथील व्हीसीए ग्राऊंड समोर कुकरेजा इन्फिनिटी या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. प्रीतम हा दुपारी पावणेपाच वाजता अठराव्या मजल्यावर सहकाऱ्यांसोबत काम करत होता. बांधकामाची जड वस्तू उचलताना तोल गेल्याने तो खाली पडला. त्याच्या डोक्याला आणि पायाला जखमा झाल्या आहेत. सहकाऱ्यांनी त्याला मेयोत नेले. तेथून खासगी रुग्णालयात पाठवले. यापूर्वीही या इमारती वरुन एका मजूराचा पडून मृत्यु झाला होता.