पेंच व्याघ्र प्रकल्प, बोर व्याघ्र प्रकल्प व उमरेड- कन्हांडला अभयारण्याचे पर्यटन आज पासून सुरु
नागपूर, ( ३० सप्टेंबर २०२४ ) दरवर्षी पावसाळ्यात जंगल सफारी बंद असते. आता चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पासह नागपूर जिल्ह्यातील पेंच व्याघ्र प्रकल्प, बोर व्याघ्र प्रकल्प व उमरेड- कन्हांडला अभयारण्याचे पर्यटन मंगळवारपासून पर्यटकांसाठी खुले होणार आहे. जंगल सफारीची प्रतीक्षा असलेल्या पर्यटकांना वनविभागाने सुखद धक्का दिला आहे.
दरवर्षी पावसाळ्यात सर्व अभयारण्यांतील जंगल सफारी बंद असते. पावसाळा अजून संपलेला नाही. ५ ऑक्टोबरपासून महाराष्ट्रातून पावसाचा परतीचा प्रवास सुरू होणार आहे. मात्र, जोर ओसरला असल्याने जंगल सफारीकरिता अनुकूल परिस्थिती पाहून काही गेट्सवरून पर्यटन सुरू करण्याचा निर्णय वनविभागाने घेतला आहे. यंदा झालेल्या अतिवृष्टीमुळे
जंगल सफारीचे रस्तेही खराब झाले आहेत. त्यामुळे सद्यः स्थितीत प्रकल्पातील सिल्लारी गेट, खुर्सापार गेट, बनेरा गेट व चोरबाहुली गेटवरून सफारीसाठी परवानगी देण्यात आली आहे. बोर व्याघ्र प्रकल्पात बोर धरण गेटपासून २० किलोमीटरपंर्यंत रस्ते सफारीकरिता उपलब्ध राहणार आहेत. उमरेड-पवनी-क-हांडला अभयारण्यातील कहांडला पर्यटन झोन, पवनी पर्यटन झोन व गोठणगाव पर्यटन झोनअंतर्गत १५ किमी व २० किमी रस्ते सफारीकरिता अनुकूल नाहीत.
दरम्यान, सध्या १ ते १५ ऑक्टोबरपर्यंत सफारीची बुकिंग ऑफलाईन राहणार आहे. पर्यटकांसाठी ऑफलाईन पद्धतीने गेटवरील वाहन क्षमतेच्या मर्यादत सफारी सुविधा उपलब्ध राहणार आहे. १६ ऑक्टोबरपासून महाईकोटूरिझमच्या संकेतस्थळावरून ऑनलाईन बुकिंगची सुविधा उपलब्ध होणार असल्याचे वनविभागातर्फे स्पष्ट करण्यात आले.