छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करिअर शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
नागपूर, दि. 13 : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था व जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने कविवर्य सुरेश भट सभागृहात छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करिअर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन आ. मोहन मते यांच्या हस्ते करण्यात आले . या शिबिराला युवक-युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
आ. अभिजित वंजारी यांची यावेळी विशेष उपस्थिती होती. व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालयाचे सहसंचालक पुरुषोत्तम देवतळे, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी अनंत सोमकुवर, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे उपसंचालक प्रमोद ठाकरे, कौशल्य विकास व रोजगार विभागाचे सहआयुक्त प्रभाकर हरडे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा व्हिडिओ संदेश दाखविण्यात आला.
एक दिवसीय शिबिरामध्ये दहावी व बारावीनंतर काय, भविष्यातील शिक्षणाच्या व रोजगाराच्या व स्वयंरोजगाराच्या संधी, व्यक्तिमत्व विकास, बायोडाटा तयार करणे, मुलाखतीची तयारी करणे, नवीन तंत्रज्ञानावर आधारित प्रशिक्षण व रोजगाराच्या संधी याविषयी तज्ञांकडून सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहसंचालक पुरुषोत्तम देवतळे यांनी केले. सूत्रसंचालन रेणुका देशकर यांनी तर आभार औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे गटनिर्देशक शिवाजी ढुमणे यांनी मानले.