काटोल उपविभागीय पोलीस ठाणे व सदनिकांचे लोकार्पण थाटात
नागपूर दि. १९ : काटोल येथील अद्ययावत उपविभागीय पोलीस ठाणे,काटोल व नरखेड येथील पोलीस सदनिकांचे लोकार्पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज करण्यात आले.
काटोल येथील उपविभागीय कार्यालयात आढावा बैठकीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज येथे आले होते. यावेळी काटोल येथील अद्ययावत उपविभागीय पोलीस कार्यालय व ठाणे, तसेच काटोल, नरखेड, कुही पारशिवनी, खापा येथील सदनिकांचे लोकार्पण करण्यात आले. काटोल येथील उपविभागीय कार्यालयाचे प्रत्यक्ष लोकार्पण तर अन्य ठिकाणचे दूरदृष्य प्रणालीद्वारे लोकार्पण करण्यात आले.
या लोकार्पण सोहळ्याला खासदार कृपाल तुमाने,आमदार चंद्रशेखर बावनकुळे, आमदार अनिल देशमुख, आमदार आशिष जायस्वाल, अप्पर पोलीस महासंचालक तथा पोलीस गृहनिर्माण व कल्याण मंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक अर्चना त्यागी, विशेष पोलीस महानिरिक्षक डॉ. छेरींग दोरजे, जिल्हाधिकारी डॉ. विपिन मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, पोलीस अधीक्षक ग्रामीण विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक संदीप पखाले, उपविभागीय पोलीस अधिकारी अजय चांदखेडे, ठाणेदार अशोक कोळी आदींसह वरिष्ठ पोलिस अधिकारी उपस्थित होते.
या परिसरातील अनेक ठाण्यातील निवासी संकुलाबाबतची अनेक वर्षांची मागणी होती. उपमुख्यमंत्र्यांनी डिजिटल पद्धतीने काटोल येथील 63 पोलीस सदनिका, नरखेड येथील 61 पोलीस सदनिकांचे लोकार्पण करण्यात आले. लोकार्पण सोहळ्यानंतर परिसरातील पेट्रोलिंग गाड्यांना हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आले तर यावेळी विशेष कार्य करणाऱ्या पोलिसांचा उपमुख्यमंत्र्यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.