मताधिक्याची गुढी उभारण्यासाठी आशीर्वाद द्या!*
केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी : तेली समाज बांधवांच्या वतीने मेळाव्याचे आयोजन*
*नागपूर - शिक्षण, आरोग्य, पर्यटन, एव्हिएशन, रोजगार, लॉजिस्टिक्स अशा अनेक क्षेत्रांमध्ये नागपूरला लौकीक प्राप्त करून देण्याचा गेल्या दहा वर्षांमध्ये प्रामाणिक प्रयत्न केला. उत्तम रस्ते, उड्डाणपूल, भुयारी मार्ग निर्माण करून सर्वसामान्य नागरिकांचे जीवन सुसह्य करण्याच्या दिशेने पाऊल टाकले. आता निवडणुकीत विक्रमी मतांची गुढी उभारण्यासाठी मला तुमचे आशीर्वाद हवे आहेत, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी आज (मंगळवार) केले.*
तेली समाज बांधवांच्या वतीने जवाहर वसतीगृहाच्या सभागृहात मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी आमदार कृष्णा खोपडे, रमेश गिरडे, दिलीप तुपकर, श्री. नाना ढगे, ईश्वर बाळबुधे आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती. यावेळी विविध संस्था व मंडळांच्या वतीने ना. श्री. नितीन गडकरी यांचा सत्कार करण्यात आला. समाज आपल्या पाठिशी असल्याचा विश्वास उपस्थितांनी दिला. ना. श्री. गडकरी म्हणाले, ‘नागपूरने एज्युकेशन हबच्या दिशेने आधीच वाटचाल सुरू केलेली आहे. याठिकाणी सिम्बायोसीस, ट्रिपल आयटी, आयआयएम यासारख्या मोठ्या शिक्षण संस्था आल्या. लवकर चाळीस एकरमध्ये नरसी मोनजी नावाची प्रसिद्ध शिक्षण संस्था नागपुरात येणार आहे. भविष्यात आपल्या शहरातील तरुणांना शिक्षणासाठी मुंबई-पुण्याला जाण्याची गरज पडणार नाही, याचा मला विश्वास आहे. यासोबतच एव्हिएशन हब, हेल्थ हब म्हणूनही नागपूरची ओळख होऊ लागली आहे.’ मिहानला सुरुवातीच्या काळात काही लोकांनी विरोध केला होता. पण आज त्याच मिहानमध्ये ६८ हजार तरुणांना रोजगार मिळाला आणि येत्या वर्षभरात आणखी मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होणार आहे. रोजगार निर्मितीला माझे प्राधान्य राहिले आहे, असेही ते म्हणाले. क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून दिले. सांस्कृतिक महोत्सवाच्या माध्यमातून जागतिक ख्यातीच्या कलावंतांचे सादरीकरण नागपूरकरांना अनुभवता आले, याचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला.
दिव्यांग, ज्येष्ठांची सेवा*
आजवरच्या राजकीय कारकिर्दीत ४० ते ४५ हजार लोकांचे हार्ट ऑपरेशन करून दिले. कृत्रिम अवयव वितरित करून दिव्यांगांचे जगणे सुसह्य करण्याचा प्रयत्न केला. कर्णयंत्र देऊन, मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करून ज्येष्ठांची सेवा केली. आतापर्यंत १ लाखांहून अधिक ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना मदत केली. कारण मी समाजसेवा करण्यासाठीच राजकारणात आलो आहे, असे ना. श्री. नितीन गडकरी म्हणाले.