उद्योगांसाठी विश्वासार्हता हे सर्वांत मोठे भांडवल*
केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी : ‘पगारिया जेबीएन महाकुंभ’चे आयोजन*
*नागपूर: ( दि. २९ जुन २०२४ ) उद्योग करण्यासाठी भांडवली गुंतवणुक, अद्ययावत तंत्रज्ञान, इतर संसाधने आवश्यक आहेत. पण त्याहीपेक्षा जास्त महत्त्वाचे आहे प्रामाणिकपणा, विश्वासार्हता, गुणवत्ता आणि पारदर्शकता. आज एकविसाव्या शतकात या चार गोष्टी कुठल्याही उद्योगांसाठी सर्वांत मोठे भांडवल आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी आज (शनिवार) केले.*
आरपीटीएस मैदानावर आयोजित ‘पगारिया जेबीएन महाकुंभ’ या कार्यक्रमात ना. श्री. गडकरी बोलत होते. या कार्यक्रमाला खासदार प्रफुल्ल पटेल, माजी खासदार अजय संचेती, महाकुंभचे समन्वयक उज्ज्वल पगारिया, आयआयएमचे अध्यक्ष के. पी. गुरनानी, तेजराज गोलछा, गणपतराज चौधरी, राजेश चंदन, विनोद दुग्गड यांची प्रमुख उपस्थिती होती. ना. श्री. गडकरी म्हणाले, ‘आज देशाच्या जीडीपीमध्ये मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राचे २२ ते २४ टक्के, सेवा क्षेत्राचे ५२ ते ५४ टक्के आणि कृषी क्षेत्राचे १२ ते १४ टक्के योगदान आहे. भारत आत्मनिर्भर व्हायचा असेल तर कृषी विकास दर २५ टक्क्यांपर्यंत न्यावा लागेल. ‘जल, जमीन, जंगल आणि जानवर’ यावर आधारित अर्थव्यवस्था निर्माण झाली तर रोजगार निर्मिती होईल आणि आर्थिक विकास दर वाढून भारत आत्मनिर्भर होईल. उद्योग क्षेत्राने ग्रामीण, कृषी आणि आदिवासी या क्षेत्राकडे लक्ष देणे आवश्यक आहे.’ आज आपल्याकडे तंत्रज्ञान आणि संसाधनांची नाही तर उद्योजकतेची कमतरता आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. ना. श्री. गडकरी म्हणाले, ‘उद्योजकांनी भविष्याची चिंता करताना भविष्यातील तंत्रज्ञानाचाही विचार करावा आणि डोळ्यापुढे चीनचे लक्ष्य ठेवावे. भारत आणि चीन यांच्यात १५ ते २० वर्षांचे अंतर आहे. प्रत्येक क्षेत्रात त्यांचा टर्नओव्हर किती आहे आणि पुढच्या पाच वर्षांनंतर किती असेल याचा अभ्यास करावा लागेल. यात अशक्य असे काहीच नाही. काही वर्षांपूर्वी वाहन उद्योगात आपण जगात सातव्या क्रमांकावर होतो. आज आपण तिसऱ्या क्रमांकावर आहोत. आपल्याला जगातील क्रमांक एकची अर्थव्यवस्था व्हायचे आहे, हे व्हिजन ठेवावे लागेल. देशातील गरिबी, बेरोजगारी दूर करावी लागेल आणि उद्योग, कृषी आणि सेवा क्षेत्राला प्रोत्साहन द्यावे लागेल. गुंतवणुक वाढवावी लागेल. तसे झाले तर रोजगाराची क्षमता वाढेल. आपण क्रमांक एकची अर्थव्यवस्था झालो तर मोठ्या प्रमाणात रोजगारही निर्माण होतील.’