काटोल-नरखेडमध्ये अनिल देशमुखांचे वर्चस्व कायम
★ ८३ पैकी ६८ ग्राम पंचायतीवर एक हाती सत्ता
★ ८२ टक्के ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचा झेंडा
काटोल ( द़ि. ७ नोव्हेंबर २०२३ ) सर्वांचे लक्ष लागलेल्या काटोल नरखेड तालुक्यात राज्याचे माजी गृहमंत्री व या भागाचे आमदार अनिल देशमुख यांनी आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. ८३ ग्राम पंचायतपैकी ६४ ग्राम पंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनिल देशमुख गटाने एक हाती सत्ता मिळवली आहे. या विजयानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार विजय उत्सव साजरा केला.
कातलाबोडी येथील ग्राम पंचायत अविरोध होवून येथे सरंपचसह सर्व सातही महिला सदस्य बिनविरोध निवडुन आल्या होत्या. काटोल तालुक्यात ६८ ग्राम पंचायत सदस्य बिनविरोध निवडुन आले होते. यापैकी ५४ सदस्य हे राष्ट्रवादी काँग्रेसचे होते. तसेच नरखेड तालुक्यातील ३४ ग्राम पंचायत सदस्य बिनविरोध निवडुन आले आहेत. यापैकी २७ सदस्य हे राष्ट्रवादी काँग्रेसचे होते. एकुणच दोन्ही तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या ग्राम पंचायती येणार हे जवळपास निश्चीत होते. काटोल तालुक्यातील पंचधार, मरगसुर तर नरखेड तालुक्यातील गोधनी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य बिनविरोध निवडुन आले होते. यामुळे विरोधकांनी येथील सरपंच स्वत:चा निवडुन आणण्यासाठी बराच प्रयत्न केला. परंतु यात त्यांना यश आले नाही. या तिन्ही ग्राम पंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सरपंच विजयी झाले.
नरखेड तालुक्यातील खरसोली येथे जरी अजीत पवार गटाचा सरपंच विजय झाला असला तरी येथे ९ पैकी ७ सदस्य हे अनिल देशमुख गटाचे विजयी झाल्याने येथे उपसरपंच हा त्यांच्या गटाचा होणार आहे. काटोल तालुक्यातील ५२ पैकी ४२ तर नरखेड तालुक्यातील २९ पैकी २४ ग्राम पंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आली. तर याच मतदार संघात येणाऱ्या नागपूर ग्रामिण तहसील मधील बाजारगाव व सातनवरी या दोन्ही ग्राम पंचायतीवर राष्ट्रवादीने एक हाती सत्ता मिळविली. काटोल – नरखेड विधानसभेमध्ये जवळपास ८२ टक्के ग्राम पंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकला आहे. या विजयामुळे राष्ट्रवादी कॉग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह निमार्ण झाला आहे. विजयी सर्व उमदेवारांचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख व जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख यांनी अभिनंद केले आहे.