देशभक्तीच्या नाटिकांनी रंगला सांस्कृतिक कार्यक्रम*
*स्वतंत्र्यदिनाला शाळकरी मुलांचे दिमाखदार सादरीकरण*
नागपूर,दि. 15 : भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 76 व्या वर्धापन दिनानिमित्त सिव्हिल लाईन्स येथील डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात जिल्हाप्रशासन व जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या वतीने ‘मेरी माटी मेरा देश’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांच्या हस्ते झाले. यावेळी शिक्षणाधिकारी माध्यमिक रवींद्र काटोलकर व शिक्षणाधिकारी प्राथमिक रोहिणी कुंभार उपस्थित होते. या कार्यक्रमास प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
प्रारंभी दीप प्रज्वलित करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमात पोद्दार इंटरनॅशनल स्कुल, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक विद्यालय दवलामेठी, सेंट्रल स्कुल, एम.बी. कॉन्व्हेंट, सेंट पॉल स्कुल व नवयुग प्राथमिक विद्यालय राजाबाक्षा नागपूर येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या चमुंनी झासी की राणी.., वंदेमातरम.., आगे- आगे सबसे आगे.., जहॉ डाल डाल पर.., भारत अनोखा राग.., वंदेमातरम.. या देशभक्तीपर गीतांवर अप्रतिम समुहनृत्य सादर केलीत.
सरस्वती विद्यालय, टाटा पारसी स्कुल, सेंट उर्सुला गर्ल्स हायस्कुल, बी.जी. श्राफ विद्यालय, नुतन भारत विद्यालय, एम.के. एच. संचेती स्कुल, सेंट एम.बी. हायस्कुल, श्री. फतेचंद केशवानी सिंधी हिंदी स्कुल, दयानंद आर्या कन्या स्कुल आणि श्री. मोहनलाल रुधवानी स्कुल येथील विद्यार्थ्यांच्या चमुंनी देशभक्तीने औतप्रोत भरलेल्या समुह नाटीका सादर केल्या. देश व वीरांप्रती कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या या नृत्य व नाटिकेस प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला
कार्यक्रमाचे संचालन केंद्र प्रमुख अर्चना पालटकर यांनी केले. शेवटी या सांस्कृतिक कार्यक्रमात विजेत्या चमुंना बक्षिस वितरित करण्यात आले. यावेळी विद्यालयाचे शिक्षक, शिक्षिका, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.