व्यवसायात मानवी संबंधांचे व्यवस्थापनही महत्त्वाचे*
*केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी : सेंट्रल इंडिया मॅनेजमेंट कॉन्क्लेव्हचे उद्घाटन*
*नागपूर: ( दि. २ मार्च २०२४ ) व्यवसायामध्ये मानवी संबंधांना देखील खूप महत्त्व आहे. आपण सहकाऱ्यांसोबत कसे वागतो, कसे बोलतो, आपले नेतृत्व कसे आहे यावर व्यवसायाचे यश अवलंबून असते. त्यामुळे ‘मानवी संबंधांचे व्यवस्थापन’ कसे करायचे याचाही अभ्यासक्रमात समावेश असायला हवा, अशी अपेक्षा केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग ना. श्री. नितीन गडकरी यांनी आज (शनिवार) येथे व्यक्त केली.*
विदर्भ मॅनेजमेंट असोसिएशनच्या वतीने आयोजित सेंट्रल इंडिया मॅनेजमेंट कॉन्क्लेव्हचे ना. श्री. नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी डॉ. भीमराया मेत्री, विशाल अग्रवाल, के.एस. चिमा, श्रीकांत संपथ, ब्रीज सारडा, सौरभ मोहता आदींची प्रमुख उपस्थिती होती.
ना. श्री. नितीन गडकरी म्हणाले, ‘व्यवसाय व व्यवस्थापनासाठी उत्तम तंत्रज्ञान पुरेसे नाही. त्या जोरावर यश मिळेल, पण ते तात्कालिक असेल. दीर्घकाळ यशस्वी राहायचे असेल तर मूल्य अधिक महत्त्वाची आहेत. टीमवर्क, वागणूक, विश्वासार्हता, सकारात्मकता आणि आत्मविश्वास याला खूप महत्त्व आहे. काही लोक संकटात संधी शोधतात तर काही संधीमध्ये समस्या निर्माण करतात. बरेचदा अहंकार आणि वागणुकीमुळे संपूर्ण चित्र बदललेले आपण बघतो. त्यामुळे मानवी संबंधांनाही तेवढेच महत्त्व आहे.’ नेतृत्व करणाऱ्याने पुढील ५० वर्षांचा विचार केला पाहिजे. त्याच्याकडे योग्य दृष्टीकोन असणे आवश्यक आहे. गुणवत्ता, मूल्य, पारदर्शकता कायम ठेवून उत्पादन शुल्क कमी करण्याचा विचार केला पाहिजे, असेही ना. श्री. गडकरी म्हणाले. व्यवस्थापन हे केवळ संसाधन आणि तंत्रज्ञानाशी संबंधितच आहे असे नाही. नेतृत्व, प्रामाणिकपणा, विश्वासार्हता आणि मूल्य ही चतुःसूत्री देखील व्यवस्थापनाचाच भाग आहे. या चतुःसूत्रीच्या आधारावरच उत्तम व्यवस्थापनाच्या माध्यमातून आपल्या प्रदेशातील क्षमता ओळखून त्यांचे संधीमध्ये रूपांतर करण्याचा प्रयत्न करा, असे आवाहनही ना. श्री. नितीन गडकरी यांनी केले.