होय, आम्ही रुजवू आध्यात्मिक संस्कृती!*
केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांना भजन मंडळांनी दिला विश्वास*
*नागपूर - नागपुरात भजन, कीर्तनाच्या माध्यमातून आध्यात्मिक संस्कृती रुजविण्यासाठी आणि नवीन पिढीमध्ये आध्यात्मिक संस्कार रुजविण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार, असा विश्वास नागपुरातील भजन मंडळांनी आज (शुक्रवार) केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांना दिला.*
ना. श्री. नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी आयोजित कार्यक्रमात शहरातील बहुसंख्य भजन मंडळांना साहित्य वितरित करण्यात आले. यामध्ये टाळ, तबला आणि हार्मोनियमचा समावेश आहे. या कार्यक्रमाला आमदार मोहन मते, ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानचे विश्वस्त प्रभाकर येवले, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू डॉ. गौरीशंकर पाराशर यांची प्रमुख उपस्थिती होती.
शहरातील भजनांच्या कार्यक्रमांची परंपरा कायम राहावी आणि त्याला प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांच्या वतीने नागपुरातील भजन मंडळांना साहित्य वितरित करण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने या उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. आज मंत्री महोदयांच्या निवासस्थानी आयोजित कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात मंडळांची उपस्थिती होती. सर्व धर्माच्या मंडळांचा यामध्ये समावेश होता. यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना ना. श्री. नितीन गडकरी म्हणाले, ‘शहरातील आध्यात्मिक परंपरा कायम राहावी, यासाठी सांस्कृतिक महोत्सवांतर्गत भक्ती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. यात सर्व धर्माच्या धार्मिक अधिष्ठानांची आराधना करण्यात आली. याशिवाय खासदार भजन स्पर्धाही आयोजित करण्यात आली. यातून आपल्या धार्मिक व आध्यात्मिक परंपरेची गोडी तरुण पिढीमध्ये निर्माण व्हावी, हा उद्देश आहे. साहित्य वितरित करण्याचाही तोच उद्देश आहे.’ साहित्य मिळाल्यानंतर भजन मंडळांमधील उत्साह वाढीस लागावा, अशी अपेक्षाही ना. श्री. नितीन गडकरी यांनी व्यक्त केली. यावेळी नागपुरातील भजन मंडळाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. तसेच माजी नगरसेवक आणि नगरसेविकांची आवर्जून उपस्थिती होती.