*▪️इतर मागास बहुजन कल्याण विभागाला जाहिरातीवर उधळपट्टीसाठी 31 कोटी*
▪️विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी मात्र सरकारकडे पैसे नाहीत*
*सरकारची ही कोटी कोटीची उड्डाणे कशासाठी- विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल*
मुंबई, दि. 12: इतर मागास बहुजन कल्याण विभागाला जाहिरातबाजीसाठी 31 कोटींची उधळपट्टी करता येणार आहे. कारण आता तसा शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. सरकारकडे जाहिरातीवर उधळण्यासाठी कोट्यावधी रूपये आहेत. मात्र गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यासाठी पैसा नाही. ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांना मदत करण्यापेक्षा या सरकारला जाहिरातबाजी महत्वाची वाटते. सरकारची ही कोटी कोटीची उड्डाणे कशासाठी असा सवाल करत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारला फटकारले आहे.
राज्य सरकारने जाहिरातबाजीवर 31 कोटींची उधळपट्टी करण्यापेक्षा विद्यार्थ्यांच्या हितासाठी हा पैसा खर्च करावा. जाहिरातीसाठी उपलब्ध केलेल्या 31 कोटीत किमान 31 विद्यार्थ्यांना परदेशात शिकण्यासाठी शिष्यवृत्ती मिळेल.ओबीसी समाजाच्या विद्यार्थ्यांना पुस्तके नीट उपलब्ध होत नाहीत. त्यांना आवश्यक असणारी वसतीगृहे उपलब्ध नाहीत. या बाबींवर पैसा खर्च करण्यापेक्षा जाहिरातीवर या सरकारची उधळपट्टी सुरू आहे. त्यामुळे हे सरकार जाहीरातबाज असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे, अशा शब्दात श्री. वडेट्टीवार यांनी सरकारवर निषाणा साधला आहे.
ओबीसी समाजाच्या नावाने राजकारण करण्यापेक्षा त्यांच्या हिताची कामे केली असती तर प्रसिध्दीसाठी उधळपट्टी करण्याची गरज पडली नसती. ओबीसी आरक्षणाला कोणी विरोध केला हे नव्याने सांगण्याची गरज नाही. त्यामुळे एकीकडे आरक्षणाला विरोध करायचा आणि दुसरीकडे मात्र जाहिरातबाजी करून कामाचा आव आणायचा. हे धोरण आता सर्वसामान्य ओबीसी बांधवांच्या लक्षात आले आहे. त्यामुळे या जाहिरातबाजीचा काही उपयोग होणार नाही. विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागास वर्ग, विषेश मागास प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षण घेण्यासाठी 2022-23 मध्ये फक्त 1 कोटी 75 लाख रूपये निधी खर्च झाल्याची माहिती समोर येत आहे. जाहिरातीसाठी मात्र 31 कोटींची उधळपट्टी करण्यात येत आहे. सरकारने जाहिरातींपेक्षा प्रत्यक्ष कामावर पैसा खर्च करावा, अशी मागणी श्री. वडेट्टीवार यांनी सरकारकडे केली आहे. सरकारमध्ये असणाऱ्या ओबीसी नेत्यांना 31 कोटींच्या उधळपट्टीबाबत काहीच वाटत नाही, याबाबत श्री. वडेट्टीवार यांनी खेदही व्यक्त केला आहे.
***