हा तर विकासाचा ट्रेलर, पिक्चर अभी बाकी है; नितीन गडकरी
★ दक्षिण नागपूर भाजपा बुथ शक्ती केंद्र आणि पदाधिकारी संमेलन*
*नागपूर: ( दि. १८ मार्च २०२४ ) ‘नागपुरातील मिहान हे खऱ्या अर्थाने एव्हिएशन हब झाले आहे. राफेलचे काम सुरू झाले आहे. फाल्कन आणि टालसारख्या कंपन्या आल्या. एमआरओमुळे विमानांचे सर्व्हिस स्टेशन नागपुरात तयार झाले. भारतातील हजारो विमाने मेन्टनन्ससाठी नागपुरात येणार आहेत. मिहानमधील कंपन्यांमध्ये आतापर्यंत नागपुरातील ६८ हजार तरुणांना नोकऱ्या लागल्या आहेत. एम्स, आयआयएम, ट्रिपल आयटीसारख्या दिग्गज संस्था नागपुरात आल्या. चोवीस तास पाणी पुरवठ्याचे स्वप्न पूर्णत्वाच्या दिशेने आहे. शहरातील सगळे रस्ते काँक्रिटचे होत आहेत. पण विकासाचा हा केवळ ट्रेलर आहे... पिक्चर अभी बाकी है,’ या शब्दांत केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी नागपूरच्या चौफेर विकासाचा निर्धार व्यक्त केला.
मानेवाडा-बेसा मार्गावरील महालक्ष्मी सभागृहात दक्षिण नागपूर भाजपा बुथ शक्ती केंद्र आणि पदाधिकाऱ्यांचे संमेलन आयोजित करण्यात आले. यावेळी आमदार मोहन मते, आमदार प्रवीण दटके, भाजप नेते श्री. संजय भेंडे, श्री. देवेंद्र दस्तुरे, श्री. विजय आसोले यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यकर्त्यांचा उत्साह बघून यंदाच्या निवडणुकीत मोठी आघाडी मिळेल, असा विश्वास असल्याचे ना. श्री. गडकरी म्हणाले. ‘दहा वर्षांमध्ये पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आपल्या सरकारने केलेली समाजोपयोगी कामे जनतेपर्यंत पोहोचविण्याची संधी या निवडणुकीत आपल्याला आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे परफॉर्मन्स आडिट घेऊन आपण जनतेच्या न्यायालयात जाणार आहोत,’ असेही ना. श्री. नितीन गडकरी म्हणाले.
नितीन गडकरी म्हणाले, ‘मी आमदार झालो तेव्हा नागपूरच्या रिंगरोडचा प्रश्न ऐरणीवर होता. खूप अपघात व्हायचे. मी मंत्री झाल्यावर साडेचारशे कोटी रुपये देऊन पूर्ण काँक्रिटचा रस्ता. आता उड्डाणपूलही होणार आहे. दक्षिण नागपूरमध्ये पाण्याचा प्रश्न होता. आता ही समस्या जवळपास संपुष्टात आलेली आहे. आपण चोवीस तास पाण्याची योजना आणली. आज शहराच्या ७५ टक्के भागात चोवीस तास पाणी. येत्या चार महिन्यात संपूर्ण शहराला ही सुविधा मिळेल. नागपूरचा विस्तार लक्षात घेऊन प्रत्येक योजना राबविण्यात येत आहे.’ गेल्या दहा वर्षांमध्ये नागपुरात १ लाख कोटी रुपयांची कामे झाली. नागपूरमधील मेट्रोचाही विस्तार होत आहे. मेट्रोच्या स्टेशनजवळ मोठे पार्किंग, मार्केट उभारले जाणार आहे. झिरो माईलवर वीस मजली स्टेशन उभे होत आहे. शेजारीच भुयारी मार्गाचे काम सुरू आहे. अनेक उड्डाणपूल, भुयारी मार्ग तयार झाले आहेत. उत्तर, मध्य, पूर्ण, दक्षिण नागपूरला जोडणारे उड्डाणपूल तयार होत आहेत. नागपूर शहरात फक्त सेंट्रल रोड फंडातून ४ हजार कोटी रुपयांची कामे झाली आहेत, असेही ते म्हणाले.