महालक्ष्मी जगदंबा मंदिरात नवरात्री उत्सवाची तयारी पूर्ण*
◆देवस्थानचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती
◆ मंदिर ट्रस्ट व जिल्हा प्रशासनात व्यवस्थेबाबत बैठक
कोराडी: (दि, ०८ ऑक्टोंबर २०२३) मध्यभारतातील कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान कोराडी येथील जागृत महालक्ष्मी जगदंबा मंदिरात १५ ऑक्टोंबरपासून सुरू होणाऱ्या अश्वीन नवरात्री उत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. १० दिवस चालणाऱ्या नवरात्री उत्सवात लाखोंच्या संख्येत भाविक महालक्ष्मी जगदंबाचे दर्शन घेण्यासाठी येणार आहेत. भाविकांना दर्शनात कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, याची काळजी मंदिर व्यवस्थापनाने व जिल्हा प्रशासनाकडून घेतली जाणार असल्याची, माहिती मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आ. श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. नवनिर्मित रामायण सांस्कृतिक केंद्र देखील यावेळी भाविकांना पाहता येणार आहे.
रविवारी कोराडी देवी मंदिर व्यवस्थापनाचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह जिल्हा प्रशासनातील प्रमुख अधिकाऱ्याच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली. मंदिरात येणाऱ्या भाविकांना यावेळी नव्याने तयार करण्यात आलेल्या देखण्या कौलारू दर्शनबारीच्या माध्यमातून मंदिरात प्रवेश मिळणार आहे. यासोबतच विशेष देणगी राशीतूनही सर्वसामान्य भाविकांनाही व्हीआयपी दर्शन घेता येईल. त्यासाठीची व्यवस्था पूर्ण झाली आहे. भाविकांच्या चारचाकी वाहनांच्या पार्किंगसाठी मंदिराच्या मागच्या भागात व्यवस्था करण्यात आली आहे तर दुचाकी वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था मंदिराच्या समोरच्या परिसरात करण्यात आली आहे.
यावेळी उपाध्यक्ष नंदू बजाज, सचिव दतू समरितकर, सहसचिव प्रभा निमोणे, कोषाध्यक्ष सुशीला मंत्री, विश्वस्त अड. मुकेश शर्मा, प्रेमलाल पटेल, अजय विजयवर्गी, अशोकबाबू खानोरकर, केशवराव फुलझेले, डॉ. नंदिनी त्रिपाठी, बाबूराव भोयर, लक्ष्मीकांत तडस्कर, जि.प. सदस्य नाना कंभाले, महादुला नगराध्यक्ष राजेश रंगारी, कोराडी सरपंच नरेंद्र धनोले, पंचायत समिती सदस्य सविता जिचकार, कोराडी उपसरपंच आशीष राऊत यांच्यासह मंदिर व्यवस्थापनातील कर्मचारी, जिल्हाधिकारी कार्यालय, पोलिस प्रशासन, एनएमआरडीए, जिल्हा परिषद, महानगर पालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, महावितरण, पाणीपुरवठा, अग्नीशमन दल, कोराडी वीज केंद्रातील अधिकाऱ्यांसह विविध स्थानिक विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
पोलिसांचा तगडा बंदोबस्त
मदिरात येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी ११०० पोलिस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त लावण्यात येणार आहे. यात १३ पोलिस निरीक्षक, ४४ पोलिस उपनिरिक्षक, १० महिला पोलिस उपनिरक्षक, ११८ महिला पोलिस, २४३ शिपाई, ७३ होमगार्ड व ५३ महिला होमगार्ड असे एकूण ५५४ अधिकारी व कर्मचारी दिवसा व एवढाच पोलिस बंदोबस्त रात्री लावला जाणार आहे. परिमंडळ ५ चे डीसीपी श्रवण दत्त, डीसीपी श्वेता खेडकर, डीसीपी गोरख भामरे, एसीपी संतोष खांडेकर, कोराडीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय नाईक या सुरक्षा व्यवस्थेवर लक्ष ठेऊन राहणार आहेत.
अशा असतील सुविधा
• नागपूरहून कोराडीपर्यंत येणाऱ्या भाविकांसाठी नागपूर महानगर पालिकेच्या ७४ बसेस उपलब्ध असतील. आयचित मंदिर व सिताबर्डी टर्मिनल्सवरून या बसेस कोराडीकडे येतील.
• जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे १० कर्मचारी व डिस्पेन्सरी मंदिर परिसरात दोन ठिकाणी उपलब्ध राहणार आहे.
• प्रसाधनासाठी फिरते शौचालय उपलब्ध राहणार आहे. भाविकांना अधिकाधिक सुविधा व आनंदमयी वाताबरणात मातेचे दर्शन घेता यावे यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे.