सर्व ग्रामपंचायतींमध्ये बालविवाह प्रतिबंधात्मक शपथ घेणार
नागपूर, दि. 28 : एक मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त सर्व ग्रामपंचायतींमध्ये होणा-या ग्रामसभेमध्ये बालविवाह प्रतिबंधात्मक शपथ घेतली जाणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी यासंदर्भातील निर्देश संबंधितांना दिले आहेत.
नागपूर जिल्हा बालविवाह मुक्त अभियान राबविण्याकरीता जनजागृती होण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचा एक भाग म्हणून सर्व ग्रामपंचायतींमध्ये बालविवाह प्रतिबंधात्मक शपथ घेतली जाणार आहे. जिल्ह्यातील सर्वच गावांमध्ये नुकतेच बालविवाह प्रतिबंधात्मक जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. बालविवाहाचे प्रमाण आजही काही भागात आढळून येते. त्यामुळे बालविवाहास प्रतिबंधासाठी हागणदारीमुक्त गाव या संकल्पेवर आधारित बालविवाह मुक्त गाव ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. यासाठी पुढील काही दिवस विविध जनजागृतीविषयक कार्यक्रमांचे आयोजन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात येणार आहे. याचाच एक भाग म्हणून 1 मे रोजी सर्व ग्रामपंचायतींमध्ये बालविवाह प्रतिबंधात्मक शपथ घेण्यात येणार आहे.
जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हा कृती दल समिती व मिशन वात्सल्य समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला जिल्हा महिला व बालविकास विकास अधिकारी अपर्णा कोल्हे, जिल्हा परिविक्षा अधिकारी चंद्रकांत बोंडे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी भागवत तांबे, बालकल्याण समिती अध्यक्षा छाया गुरव, जिल्हा बालसंरक्षण अधिकारी मुश्ताक पठाण यांच्यासह संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
बालविवाह प्रतिबंधात्मक उपाययोजनांबरोबरच प्रशासनातर्फे जनजागृतीही करण्यात येत आहे. जिल्हा बालविवाह मुक्त करण्याचा संकल्प प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रशासनाला समाजाचेही सहकार्य आवश्यक असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.