डेंगुवर नियंत्रण मिळविण्यासाठी उपयोजना करा; सलील देशमुख
★ नरखेड येथील आढावा बैठकीत सुचना
नरखेड : ( दि. ८ सप्टेंबर २०२३ ) शहरात मोठया प्रमाणात डेंगुचे रुग्ण आढळुन येत आहे. डासांचा वाढता प्रादुर्भाव व गवतामुळे हा रोग वाढत असल्याचे समोर येत आहे. यामुळे यावर वेळीच नियंत्रण मिळविण्यासाठी तातडीने प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. प्रशासनाने डेंगुवर नियंत्रण मिळविण्यासाठी योग्य त्या उपयोजना कराव्यात अशी सुचना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व जि.प. सदस्य सलील देशमुख यांनी प्रशासनाला दिले.
ते नरखेड येथे नगर पालिकेमध्ये डेंगु संदर्भात आढावा बैठकीत बोलत होते. यावेळी नगर परिषद चे मुख्याधिकारी निशिकांत गवई, जिल्हा शल्य चिकित्सक निवृत्ती राठोड , जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख, माजी नगराध्यक्ष संजय चरडे, अनिल गजबे, अभिजित गुप्ता, माजी नगर परिषद सदस्य मनोज कोरडे, सचिन चरडे, सुधाकर ढोके, जाकीर शेख,अमोल अरघोडे, उदयन बन्सोड, पंकज क्षीरसागर, अजय सोमकुवर नितीन कडू ओम खत्री गौरव पोतदार हे प्रामुख्याने उपस्थीत होते. डेंगु हा आजार डासांमुळे होतो. यामुळे डास उत्पतीचे जे सोर्स आहे ते प्रथम नष्ट करण्याची आवश्यकता आहे. यात शहरातील खाली जागेवर असलेले गवत नष्ट करण्याची मोहीम हाता घेण्याची आवश्यकता आहे. तसेच शहरात फवारणी करुन डास नष्ट करण्यासाठी सुध्दा प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे सलील देशमुख यावेळी म्हणाले.
प्रत्येक घरात पाण्यात सुध्दा डासांचे उत्पती होत असते, यामुळे नागरीकांनी सुध्दा घरातील जुन्या व अडकळीच्या वस्तुमध्ये पाणी साठलेले असल्यास त्या वस्तुत पाणि साचु नये यासाठी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. आरोग्य विभागाने सुध्दा यात पुढाकार घेवून नागरीकांना आरोग्य सेवा देण्याची गरज आहे. सध्याच्या वातावरणा डेंगुसोबत मलेरीया व साथीचे आजार सुध्दा वाढण्याची शक्यता नाकरता येत नाही. यासाठी लागणारी औषधे व इतर वैद्यकीय सर्व गोष्टीचा साठा उपलब्ध करण्यात यावा. कोणतेही साथीचे आजार होवू नये यासाठी नगर परिषद प्रशासन व आरोग्य विभागाने लक्ष देवून वेळीच योग्य त्या उपयोजना करण्याच्या सुचना सलील देशमुख यांनी नगर परिषद प्रशासन व आरोग्य विभागाला दिले.