राजकारणातील महिलांसाठी अनसूया काळे यांचे कार्य प्रेरणादायी – सुमित्रा महाजन
राजकारणातील महिलांसाठी अनसूया काळे यांचे कार्य प्रेरणादायी – सुमित्रा महाजन
‘अनसूया माय वाईफ’ पुस्तकाचे थाटात प्रकाशन
नागपूर, 23 फेब्रुवारी
माजी खासदार स्व. अनसूया काळे यांनी राजकारणात वावरताना व्यक्तिमत्व कसे असावे, अभ्यासपूर्ण कसे बोलावे, वंचित समाजासाठी विशेषत: महिलांसाठी कसे कार्य करावे याचा वस्तुपाठ घालून दिला होता. त्यांचे हे कार्य राजकारणातील सर्व महिलांसाठी प्रेरणादायी आहे, अशा शब्दात माजी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
ज्येष्ठ उद्योजक स्व. पुरुषोत्तम काळे यांनी त्यांच्या पत्नी स्व. अनसूया काळे यांच्या आठवणींचा संग्रह असलेले मराठी पुस्तकाचा दीपाली काळे यांनी इंग्रजीत ‘अनसूया माय वाईफ - द फायर ब्रॅण्ड फ्रिडम फायटर’ या शीर्षकांतर्गत अनुवाद केला असून या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा गुरुवारी पार पडला. बनयान सभागृह, चिटणवीस सेंटर येथे झालेल्या या कार्यक्रमात माजी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी ऑल इंडिया वुमेन कॉन्फरन्सच्या माजी अध्यक्षा शीला काकडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या तर मंचावर विलास काळे, कुमार काळे, जयदेव काळे, प्रवीण काळे प्रामुख्याने उपस्थित होते.
स्व. अनसूयाबाई काळे नागपूर लोकसभा मतदारसंघातील आजवरच्या एकमेव महिला खासदार होत्या. त्यांच्या राजकीय, सामाजिक व कौटुंबिक प्रवासात स्व. पुरुषोत्तम काळे यांनी जी साथ दिली ती कौतुकास्पद होती. त्यांचे चरित्र वाचताना अनसूयाबाई यांच्या खंबीर, दृढनिश्चयी स्वभावाचा परिचय होतो, असे सुमित्रा महाजन म्हणाल्या.
शीला काकडे यांनी ऑल इंडिया वुमेन कॉन्फरन्सच्या कार्याची माहिती देताना त्यातील अनसूयाबाई काळे यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाचा उल्लेख केला. अनसूयाबाई काळे या एआयडब्ल्यूसी च्या 20 व्या अध्यक्ष होत्या. त्यांचे संस्था, समाज आणि राष्ट्रासाठीचे कार्य नव्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे, असे त्या म्हणाल्या.
राजहंस प्रकाशनचे नरेश सबजीवाले यांनी पुस्तकाबद्दल माहिती दिली. राजहंस प्रकाशन पुणेचे संचालक सदानंद बोरसे यांचा शुभेच्छा संदेश त्यांनी वाचून दाखवला. विलास काळे यांनी अनसुयाबाई काळे यांच्या कार्याबद्दल माहिती दिली. त्यांचे बालपण, शिक्षण, सामाजिक, राजकिय कार्य, स्वातंत्र्य लढ्यातील सहभाग अश्या कार्यावर प्रकाश टाकला. अनसूया काळे छाब्रानी यांनी प्रास्ताविक केले तर रूही काळे यांनी शीला काकडे यांचा तर रुपाली काळे यांनी सुमित्रा महाजन यांचा परिचय करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रणोती गद्रे यांनी केले व पूर्वा काळे यांनी आभार मानले. महानगरपालिकेच्या दहा झोनमध्ये स्व. अनसूयाबाई काळे स्मृती महिला समुपदेशन चालू असल्याची माहिती कल्पना फुलबांधे यांनी दिली. कार्यक्रमाला लीलाताई चितळे, सतीश चतुर्वेदी, कुंदाताई विजयकर, प्रगती पाटील, विशाल मुत्तेमवार, निलिमा शुक्ला आदींची प्रमुख उपस्थिती होती.