वन्यजीव सप्ताह १ ते ७ ऑक्टोबर दरम्यान
वन्यजीव सप्ताह निमित्त नागपूर वन विभाग, पेंच व्याघ्र प्रकल्प आणि सामाजिक वनीकरण च्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन*
नागपूर : ( दि. ३० सप्टेंबर २०२३ )जनमानसात वन्यप्राणी यांच्या संवर्धनाबद्दल जाणीव जागृती व्हावी या उद्देशाने देशपातळीवर दरवर्षी १ ते ७ ऑक्टोबर दरम्यान वन्यजीव सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
निसर्गाचा समतोल राखण्यात वन्यजीवांच्या भूमिकेबाबत सर्वसामान्य जनतेमध्ये जागरूकता वाढवण्यासाठी हा आठवडा पाळला जातो. यावर्षी साजरा होणाऱ्या वन्यजीव सप्ताह निमित्त १ ते ७ ऑक्टोबर दरम्यान नागपूर वन विभाग, सामाजिक वनीकरण, नागपूर आणि पेंच व्याघ्र प्रकल्प यांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. या सप्ताहाचा उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी नागपूर शहरातून सायकल रॅली चे आयोजन करण्यात आलेले असून या कार्यक्रमास राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) श्री. शैलेश टेंभुर्णीकर आणि इतर वरिष्ठ वन अधिकारी उपस्थित राहणार आहेत. याचदरम्यान वनभवनाच्या प्रांगणात श्रमदानातून स्वच्छ्ता कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
२ ऑक्टोबर रोजी सेमिनरी हिल्स येथील बालोद्यान आणि जपानी गार्डन मध्ये निसर्ग भ्रमंती चे नियोजन असून याचा आस्वाद सर्वांना घेता येईल. ३ ऑक्टोबर रोजी सकाळच्या सत्रात नागपूर येथे मानव - वन्यजीव संघर्षावर विशेष चर्चासत्राचे आयोजन केले असून यासोबतच नागपूर येथील वन भवनातील कार्यालयीन कर्मचारी यांच्यासाठी पेंच व्याघ्र प्रकल्पाचा अभ्यास दौरा नियोजित आहे. दिनांक ४ ऑक्टोबर रोजी शालेय विद्यार्थ्यांसाठी आंतरशालेय वन्यजीव विषयक प्रश्न मंजुषा आणि वन्यजीव विषयक चित्रपटाचे आयोजन गोल्डन लिफ बँक्वेट हॉल, त्रिमूर्ती नगर, नागपूर येथे करण्यात आलेले आहे तसेच जिल्ह्यातील पत्रकार बंधूंना पेंच व्याघ्र प्रकल्पाचा अभ्यास दौरा करता येणार आहे. ५ ऑक्टोबर रोजी वन विभागाच्या वतीने रामदेव बाबा अभियांत्रिकी महाविद्यालय, नागपूर येथे वन्यजीव संवर्धन वा विकास या विषयावर वाद - विवाद स्पर्धा आयोजित करण्यात आलेली असून सिल्लारी येथे पेंच व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश यांच्या दरम्यान आंतरराज्यीय समन्वय कार्यक्रमाचे नियोजन केले आहे. ६ ऑक्टोबर रोजी अंबाझरी जैवविविधता उद्यान हिंगणा येथे पक्षी निरीक्षण आणि वन भ्रमंती चा आनंद लोकांना लुटता येणार आहे. सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी ७ ऑक्टोबर रोजी सप्ताहाचा समारोपीय कार्यक्रम नियोजित असून सप्ताह दरम्यान ठेवण्यात आलेल्या विविध स्पर्धा मधील विजेत्यांना सन्मानित करण्यात येणार असून वन आणि वन्यजीव क्षेत्रात काम करणाऱ्या वन अधिकाऱ्यांचा देखील सन्मान यावेळी करण्यात येणार आहे. या सप्ताहाच्या निमित्ताने हवामान बदल आणि परिस्थितीकि या विषयावर खुल्या डिजिटल भित्तीपत्रिका निर्मिती स्पर्धा तसेच वन खात्याच्या अधिकारी - कर्मचारी यांच्यासाठी वन्यजीव अधिवास या विषयावर छायाचित्र स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या सर्व उपक्रमामध्ये सर्व व्यक्ती आणि संस्था यांनी हिरीरीने सहभाग नोंदवावा तसेच प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी सदर उपक्रमांना उपस्थित राहून व्यापक प्रसिध्दी द्यावी असे आवाहन वन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
या सर्व उपक्रमाचे आयोजन श्री. किशोर मानकर, वनसंरक्षक, सामाजिक वनीकरण, नागपूर आणि श्रीमती श्रीलक्ष्मी ए. वनसंरक्षक, नागपूर, डॉ. प्रभू नाथ शुक्ल, क्षेत्र संचालक, पेंच व्याघ्र प्रकल्प, नागपूर आणि डॉ. भारतसिंह हाडा, उपवनसंरक्षक, नागपूर यांच्या मार्गदर्शनात करण्यात आलेले आहे.