जलजागृती सप्ताहाचे थाटात उदघाटन एक लाख जल प्रतिज्ञा
नागपूर : दि. 16 : 16 ते 22 मार्च दरम्यान राबविण्यात येणाऱ्या जलजागृती अभियान सप्ताहाचे उद्घाटन व जलपूजन विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, (VIDC), सिंचन भवन येथे करण्यात आले. जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता, डॅा. प्रकाश पवार, गोसीखुर्द प्रकल्पाचे मुख्य अभियंता आशिष देवगडे, विदर्भ समन्वयक राजेश सोनटक्के, भारतीय जलसंसाधन संस्थेचे अध्यक्ष संजय वानखडे, गोसीखुर्द प्रकल्प मंडळाचे अधीक्षक अभियंता अंकूर देसाई, जल जागृती समिती सचिव डॉ. प्रवीण महाजन आदी यावेळी उपस्थित होते.
पाणी बचतीचे महत्व विषद करतांना मान्यवरांनी जलजागृती वर्षभर करावी असे आवाहन करुन दिवसेंदिवस पाण्याची पातळी घटत असून त्याबाबत जलजागृती करणे अत्यंत गरजेचे असल्याचे सांगितले.
विपाविमचे समिती अध्यक्ष तथा कार्यकारी संचालक राजेंद्र मोहिते यांच्या मार्गदर्शनात ‘लोकसहभागातून जलसमृध्दी’ ही संकल्पना घेवून 16 ते 22 मार्च या कालावधीत जलजागृती सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या वर्षी जलसंपदा विभाग, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, शिक्षण विभाग, बानाई व भारतीय जलसंसाधन संस्था नागपूर केंद्राच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी जलजागृती कार्यक्रमाचे आयोजन करुन सप्ताह साजरा करण्यात येणार आहे.
यावेळी उपस्थितांनी सामूहिक जल शपथ घेतली. या सप्ताहात सर्व कार्यालयात व नागपुरातील 100 शाळांमध्ये लाखापेक्षा जास्त सामूहिक जल शपथ घेण्यात येणार असून मोठ्या प्रमाणात जलजागृती करण्यात येणार आहे.
प्रारंभी राज्यातील 11 नाद्यांचे पाणी आणून मान्यवरांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले. या कार्यक्रमास सिंचन विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.