नरखेड एमआयडीसीसाठी सव्वादोन कोटी मंजुर - सलील देशमुख
अंतर्गत रस्ते व पथदिव्यांची होणार कामे
नरखेड, ( दि. ३० ऑगस्ट २०२३ ) नरखेड येथील २०.५९ हेक्टरमध्ये असलेल्या एमआयडीसीच्या अंतर्गत विकास कामासाठी निधीची आवश्यकता होती. यासाठी सातत्यपुर्ण पाठपुरावा सुरु होता. या पाठपुराव्याला यश आले असून एमआयडीसी मधील अंतर्गत रस्ते व पथदिवाच्या विकासासाठी दोन कोटी विस लाख रुपये मंजुर झाले असून लवकरच याची निवीदा प्रक्रीया सुरु करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख यांनी दिली.
नरखेड एमआयडीसीचा विकास होण्याकरीता प्रयत्न सुरु होते. येथे जाण्यासाठी मुख्य रस्ता नसल्याने जमीन अधिग्रहन करुन नवीन रस्ता तयार करण्यासाठी ७० लाख रुपये मंजुर करण्यात आले असून लवकरच हे काम सुध्दा होणार आहे. या शिवाय अंतर्गत रस्ते व पथदिव्याचे काम होणे सुध्दा आवश्यक होते. यासाठी पावसाळी अधिवेशनात या भागाचे आमदार माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सुध्दा उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडे मागणी केली होती. या संदर्भात सलील देशमुख यांनी सुध्दा उद्योग मंत्री सामंत यांची भेट घेतली होती.
मंजुर करण्यात आलेल्या निधीतुन अंतर्गत रस्ते व पथदिवे करण्यात येणार असल्याने येथील उद्योगाला याचा फायदा होईल. तसेच येथे सध्या जागा उपलब्ध नसल्याने नविन एमआयडीसी तयार करण्याचा प्रस्ताव सुध्दा तयार करण्यात आला आहे. टप्पा दोन मध्ये १५४.४४ हेक्टर नविन जमीन खरेदी करण्याचा प्रस्ताव उद्योग विभागाकडे सादर करण्यात आला आहे. याला सुध्दा मंजुरी मिळण्यासाठी पाठपुरावा सुरु असल्याची माहिती सलील देशमुख यांनी दिली.