भाजपा प्रदेशाध्यक्षांच्या घरी ‘श्रीं’चे आगमन*
नागपूर: ( दि. १९ सप्टेंबर २०२३ ) भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कोराडी येथील निवासस्थानी श्री गणरायांचे आगमन झाले. त्यांनी सहकुटुंब श्रींची प्रतिष्ठापना व पूजन केले. श्री गणेशाचे आगमन सर्वांच्या जीवनात आनंद व सुखाचे नवे पर्व घेऊन येवो, अशी प्रार्थना करताना श्री गणेश चतुर्थी आणि श्रीगणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.
ते शुभेच्छा देताना म्हणाले की, महाराष्ट्रात गणेशोत्सवाला सामाजिक एैक्याची व समाज प्रबोधनाची, राष्ट्रभक्तीची, गौरवशाली एतिहासिक परंपरा आहे. ही परंपरा पुढे नेताना नागरिकांनी समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन गणेशोत्सव साजरा करावा. श्री गणेश म्हणजे बुद्धी, विवेक व समृद्धीची देवता असून आपण सर्वच सर्व श्रीगणरायांचे भक्त आहोत. त्यामुळे, गणपती बाप्पांचा उत्सव उत्साहाने साजरा झाला पाहिजे. सर्वांनी सर्व एकत्र येऊन आनंदात, भक्तीमय वातावरणात गणेशोत्सव साजरा करावा. गणेशोत्सवा दरम्यान निसर्गाची काळजी घ्यावी व पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करावा. सर्वांना गणेश चतुर्थी व गणेशोत्सवाच्या शुभेच्छा!
श्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह पत्नी सौ. ज्योती, मुलगा संकेत, स्नुषा अनुष्का, मुलगी सौ.पायल, जावई लोकेश आष्टनकर, नातू अधिराज यांच्यासह संपूर्ण कुटुंबीय उपस्थित होते.
• आजचा दिवस एतिहासिक!
नव्या संसद भवनात आजपासून कामकाजाला सुरुवात झाल्याबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी व केंद्र सरकारचे अभिनंदन केले. आजचा दिवस ऐतिहासिक असून १४० कोटी भारतीयांसाठी नवे संसद भवन हे लोकशाहीचे मंदिर आहे. महिला आरक्षणाबाबत विधेयक मांडून नवा इतिहास पंतप्रधान मोदीजी यांनी घडविला. हे विधेयक मंजूर झाल्यावर देशातील निम्म्या संख्येत असलेल्या महिलांना ३३% आरक्षण मिळेल व त्या देखील देशाच्या जडण-घडणीत हातभार लावतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
• कॉंग्रेसचे काम संभ्रम निर्माणाचे!
मराठा आरक्षण देताना सर्वपक्षीय बैठकीत ओबीसींचे आरक्षण कुठेही कमी न करता मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निश्चय करण्यात आला आहे. ओबीसी महासंघाच्या मोर्चाला भाजपाचा सुरुवातीपासून पाठिंबा होता, त्यामुळे त्यात कुणी घुसले आणि फुट पाडली असा आरोप करणे चुकीचे आहे. त्याच्याशी आमचा कोणताही संबंध नाही. नाना पटोले आणि कॉंग्रेसला जनतेला समजून सांगता येत नाही, त्यामुळे ते लोकांमध्ये संभ्रम निर्माण करीत आहेत, असेही श्री बावनकुळे म्हणाले.