एसओएस शाळेचा स्लॅब कोसळून सुरक्षा रक्षकाचा मृत्यू
हिंगणा ता.२९ : मेघे ग्रुपच्या वानाडोंगरी येथील
एसओएस शाळेच्या प्रवेश द्वारा जवळील पोर्च मधील स्लॅब कोसळल्याने मलब्याखाली दबून सुरक्षा रक्षकाचा मृत्यू झाला. जेसीबीद्वारे तब्बल तीन तास मलबा हटविल्यानंतर मृतदेह बाहेर काढण्यात आला.सदर घटना आज (ता.२९) रोजी सकाळी ११ वाजताच्या दरम्यान घडली.
मृतक सुरक्षारक्षक रवींद्र कामेश्वर उमरेडकर (४९) रा.किन्ही धानोली येथील रहिवाशी आहे.एसओएस शाळेत मागील अनेक वर्षापासून सुरक्षा रक्षक म्हणून उमरेडकर कामाला होता.आज शनिवारी सकाळी सात वाजता नेहमीप्रमाणे तो ड्युटीवर आला. सकाळी नऊ वाजताच्या दरम्यान पालकांची बैठक शाळा व्यवस्थापनाने ठेवली होती. या बैठकीला पाल्यांसह पालक वर्ग ही उपस्थित होता. सदर घटना घडण्यापूर्वीच पालकांची मीटिंग आटोपल्याने सर्व जण शाळेतून निघून गेले होते. यानंतर अकरा वाजताच्या दरम्यान नेहमीप्रमाणे रवींद्र उमरेडकर हा शाळेच्या प्रवेशद्वारा जवळील मोठ्या पोर्चमध्ये टेबलसमोरील खुर्चीवर बसला होता.११ वाजताच्या दरम्यान अचानक पोस्ट मधील स्लॅब कोसळला. या स्लॅब खाली रवींद्र दबल्या गेला. कमरे खालचा भाग त्याचा पूर्णता असल्यास खाली दबला होता. बाहेर निघण्यासाठी त्याने बरीच धडपड केली. मात्र त्याच्या या धडपडीला यश आले नाही. काही वेळाने या घटनेमुळे घाबरलेल्या रवींद्रला रक्ताची उलटी झाली. यानंतर त्याची हालचाल बंद झाल्याचे प्रत्यक्ष दर्शनी सांगितले. शाळा व्यवस्थापनाने तातडीने रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले. फायर बिग्रेडच्या जवानांना घटनास्थळी बोलविण्यात आले. दोन जेसीबी ही बोलवण्यात आल्या. स्लॅप इतका मोठा होता की दोन जेसीबी आणुनही फक्त रवींद्र ला काढण्यास तब्बल तीन तास लागले. शालिनीताई मेघे रुग्णालयाच्या डॉक्टरांनी त्याला बाहेर काढल्यानंतर तपासणी केली असता मृत झाल्याचे घोषित केले. यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला.
शाळेची इमारत जवळपास २० वर्षांपुर्वीची आहे.शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ मोठा पोर्च आहे. हॅंगींग अवस्थेत लोखंडी सळाखी न लावता बांधकाम करण्यात आला होता. वरच्या साईडला लावलेले लोखंडी पाईप सडलेल्या अवस्थेत होते. पोर्चचे वजन सहन न झाल्याने हा स्लॅब कोसळल्याचे बोलले जात आहे.
घटनास्थळी सह पोलीस उपायुक्त प्रवीण तेजाले, ठाणेदार भीमा नरके यांच्यासह एमआयडीसी पोलिसांचा ताफा घटनास्थळी तैनात केला होता. उपविभागीय अधिकारी मनोहर पोटे, नायब तहसीलदार ज्योती भोसले, मेघे ग्रुप कडून मनीष वैद्य, डॉक्टर गावंडे यांच्यासह शाळा व्यवस्थापनातील कर्मचारी उपस्थित होते. घटनास्थळी बघ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणात झाली होती. अग्निशामक दलाच्या गाड्याही बोलविण्यात आल्या होत्या. *मयताच्या कुटुंबियांना मदतीची मागणी* .. या दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू झालेल्या रवींद्र उमरेडकर यांच्या कुटुंबियांना व्यवस्थापनाने मदत करावी अशी मागणी त्याचे चुलत भाऊ व तालुका काँग्रेसचे अध्यक्ष विनोद उमरेडकर व मयताच्या कुटुंबीयांनी केली आहे..... *आमदार मेघेकडून घटनेबद्दल दुःख व्यक्त* ... आमदार समीर मेघेनी सुद्धा या दुर्दैवी घटनेबद्दल व सुरक्षा रक्षक रवींद्र उमरेडकर यांच्या मृत्यू बद्दल दुःख व्यक्त केले . त्या सुरक्षा रक्षकाच्या कुटुंबातील सदस्याशी चर्चा केली असून त्यांच्या सोबत असल्याचे सांगितले.