आयुर्वेदाच्या जनजागृतीसाठी 5 नोव्हेंबर रोजी रथयात्रा व रॅली
आयुर्वेद दिन’ निमित्त क्षेत्रीय आयुर्वेदिक अनुसंधान संस्थानचे आयोजन
नागपूर : ( दि. 3 नोव्हेंबर 2023 ) आयुष मंत्रालय, भारत सरकारच्या अंतर्गत कार्यरत केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान अनुसंधान परिषद, नवी दिल्ली द्वारे संचालित क्षेत्रीय आयुर्वेदिक अनुसंधान संस्थान, नंदनवन, नागपूरच्या वतीने 10 नोव्हेंबर रोजी साजरा होणा-या 8 व्या आयुर्वेद दिनाचे औचित्य साधून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
‘हर दिन हर किसी के लिए आयुर्वेद’ ही यावर्षीच्या आयुर्वेद दिनाची मध्यवर्ती संकल्पना आहे. त्याअनुषंगाने 10 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर दरम्यान क्षेत्रीय आयुर्वेदिक अनुसंधान संस्थानद्वारे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याच शृंखलेत रविवार, 5 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 ते 8 वाजेदरम्यान शहरात आयुर्वेदाचा प्रचार व प्रसार करण्याकरीता रथयात्रा, सायकल रॅली, बाईक रॅली व ई-रिक्षा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती क्षेत्रीय आयर्वेद अनुसंधान संस्थान, नागपुरचे प्रभारी सहायक संचालक डॉ. मिलिंद सूर्यवंशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण संस्था, क्रीडा चौक येथून या सर्व रॅलींना प्रारंभ होईल. द्रोणाचार्य पुरस्कार विजेते प्रशिक्षक विजय मुनिश्वर, आशियाई स्पर्धांमध्ये सुवर्णपदक पटकावणारी महाराष्ट्राची पहिली बॉक्सर अल्फिया पठाण, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सायकलपटू अमीत समर्थ, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक डॉ. शरद सूर्यवंशी, ईश्वर देशमुख कॉलेजचे प्राचार्य एस. नायडू यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रॅलीला प्रारंभ होईल. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व्हिडिओच्या माध्यमातून रॅलीला शुभेच्छा देतील, असे डॉ. सूर्यवंशी म्हणाले.
असा राहील रॅलीचा मार्ग
बैद्यनाथ, दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद आदी 8 संस्थाचा सहभाग असलेल्या रथयात्रेमध्ये 1000 लोकांचा सहभाग राहणार असून ईश्वर देशमुख कॉलेज येथून निघून ही यात्रा मेडिकल चौक, अशोक चौक, रेशीमबाग चौक मार्गे परत ईश्वर देशमुख कॉलेजमध्ये येईल.
50 एनफील्ड रायडरचा सहभाग असलेली बाईक रॅली ईश्वर देशमुख कॉलेजमधून निघेल. मेडिकल चौक, जाटतरोडी चौक, सरदार पटेल चौक, एन.एम.सी. झोन फोर चौक, मुंजे चौक, आनंद टॉकीज चौक, झांशी राणी चौक, शंकरनगर चौक, बजाजनगर चौक, लक्ष्मीनगर चौक, दीक्षाभूमी चौक, सम्राट अशोक चौक, रेशीमबाग चौक अशी मार्गक्रमण करीत ईश्वर देशमुख येथे येईल.
सायकल रॅलीमध्ये 60 ते 70 सायकलस्वार राहणार असून तुकडोजी पुतळा, विशाल मेगा मार्ट, जगनाडे चौकमार्गे ईश्वर देशमुखला परत येईल. ई-रिक्षा रॅलीत 20 रिक्षाचालक सहभागी होणार असून मेडिकल चौक, सम्राट अशोक चौकातून ईश्वर देशमुखला ही रॅली परत येईल.
विविध संस्थांचा सहभाग
रविवार, 5 नोव्हेंबर रोजी निघणा-या विविध रॅलींमध्ये आयुर्वेद व्यासपीठ, नीमा, दत्ता मेघे इन्स्टिट्यूट, बैद्यनाथ, केडीके आयुर्वेदिक कॉलेज, श्री आयुर्वेद, शासकीय आयुर्वेदिक कॉलेज, आरोग्य भारती, विज्ञान भारती, नीरी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर्स असोसिएशन, लायन्स क्लब, आदर्श फार्मसी कॉलेज, बेटीयां शक्ती फाउंडेशन, पुलक मंच, अमर स्वरूप फाऊंडेशन आदी संस्थांचा सहभाग राहणार आहे.
पारितोषिके व प्रमाणपत्रांचे वितरण
रॅलीत सहभागी झालेल्या प्रत्येक सदस्य व संस्थांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात येणार असून विजेत्यांना पारितोषिके प्रदान केली जाणार आहेत. ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयात सर्व रॅली पोहोचल्यानंतर सकाळी 8 वाजता समारोपीय कार्यक्रम होईल. या कार्यक्रमाला आ. मोहन मते, आ. कृष्णाजी खोपडे, माजी आ. गिरीश व्यास, पद्मश्री डॉ. विकास महात्मे यांची प्रमुख उपस्थिती राहील.