कोणी बहुजन व्यक्ती रामभक्त असू शकत नाही का? विकास ठाकरेंचे भाजपने व्हायरल केलेल्या व्हिडीओवर घणाघात*
पूर्व नागपुरातही काँग्रेसचाच जलवा: जन आशीर्वाद यात्रेत*
*नागपूर, ता. १० एप्रिलः* जनतेने देशाच्या विकासासाठी भाजपला दोनवेळा संधी दिली. मात्र या दहा वर्षात सामान्य जनतेच्या हितासाठी त्यांच्या समृद्धीसाठी भाजपला काहीच करता आले नाही. त्यामुळे लोकांना रामभक्तीचा सर्टिफीकेट वाटण्याचा ठेका या स्वयंघोषीत ठेकेदारांनी घेतलाय का? असा सवाल इंडिया आघाडीतील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिकृत उमेदवार विकास ठाकरे यांनी उपस्थित केला. मध्य नागपुरात आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.
पुढे ठाकरे म्हणाले, "मला माझी प्रभू श्रीराम यांची भक्ती सिद्द करण्यासाठी कुणाच्याही सर्टिफीकेटची गरज नाही. माझ्याबद्दल "सिझनल रामभक्त" म्हणून भाजपकडून व्हिडीओ व्हायरल करण्यात येत आहे. आता हे जोशी मला माझ्या दैवताच्या भक्तीबद्दल सांगतील का? कोणी बहुजन व्यक्ती हा रामभक्त असू शकत नाही का?"
पुढे ठाकरे म्हणाले, "१९८५ पासून दरवर्षी अभ्यंकर नगर दुर्गा उत्सव मंडळाच्यावतीने आम्ही दुर्गा उत्सव साजरा करतो, प्रत्येक धर्मीय व्यक्ती उत्साहाने सहभागी होतात. आम्हाला बघून अनेकांनी विविध सण-उत्सवे साजरा करण्यास सुरुवात केली आहे. माझ्या निवासस्थानी दरवर्षी गणेशोत्सव साजरा करतो. यात नागपुरातून मोठ्या संख्येत सर्वधर्मीय बांधव सहभागी होतात. पश्चिम नागपूरच्या नागरिकांनी मला आमदार म्हणून सेवेची संधी दिली आणि मी सर्व समाजांच्या उत्सवात मी मिसळून राहतो."
बुधवारी सायंकाळी पहिली सभा दक्षिण-पश्चिम नागपूर येथील हनुमान मंदिरदवळ, जयताळा, दुसरी सभा दक्षिण नागपूर रमना मारोती मंदिर येथे आयोजित करण्यात आली आणि तिसरी सभा पूर्व नागपूर येथील डिप्टी सिग्नल येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, विनोद गुडधे पाटील, प्रफुल गुडधे पाटील, शहाणेताई, राजश्री पन्नासे, रेखा बाराहाते, वसंत बनकर यांच्यासह मोठ्या संख्येत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
*जन आशीर्वाद यात्रेत हजारोंच्या संख्येत नागरिक सहभागी*
बुधवारी आयोजित जन आशीर्वाद यात्रेची सुरुवात झाडे चौक शालीग्राम मंदिर येथून झाली. त्यानंतर इतवारी स्टेशन-प्रेमनगर झेंडा चौक-साईनगर-तुलसीनगर चौक-बुधवार बाजार-रेल्वे स्टेशन- सतरंजीपुरा-टेलिफोन एक्सचेंज चौक-कुंभार टोली मार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे रॅलीचा समारोप झाला.