मान्सूनपुर्व कामांच्या तयारीला लागा – डॉ.विपीन इटनकर ★ मान्सूनपुर्व तयारीचा घेतला आढावा
नागपूर, दि. 10 : पावसाळ्यात अतिवृष्टी व नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान व हानी टाळण्यासाठी मान्सूनपुर्व कामांच्या तयारीला लागावे. संबंधित विभागांनी मान्सूनपुर्व सर्व कामे वेळेत पूर्ण करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॅा. विपीन इटनकर यांनी दिले आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन सभागृहात मान्सुनपूर्व आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीदरम्यान हे निर्देश दिले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, पोलिस अधीक्षक ग्रामीण विशाल आनंद, निवासी उपजिल्हाधिकारी विजया बनकर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अंकुश गावंडे यांच्यासह जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, नगर परिषद मुख्याधिकारी यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
गेल्यावर्षी नागपूर जिल्ह्यात चांगले पर्जन्यमान नोंदविण्यात आले होते. पावसाळ्यात विविध नैसर्गिक आपत्तींची शक्यता असते. 2022-23 या वर्षात एकूण 39 नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. यात 19 जणांचा पुरामुळे, 17 नागरिक वीज पडून तर तीन नागरिक हे घर किंवा भिंत पडून मृत्युमुखी पडले आहेत. पावसाळ्यातील अस्मानी संकट टाळायचे असल्याचे मान्सूनपुर्व कामांच्या तयारीला लागून आवश्यक ती सर्व कामे वेळेत पूर्ण करावी, असे जिल्हाधिकारी यावेळी म्हणाले.
मान्सूनपुर्व कामांसाठी आवश्यक तो निधी शासनस्तरावरून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यंदा कमी पर्जन्यमानाचा अंदाज वर्तविण्यात आला असला तरी कुणीही गाफील न राहता आवश्यक ती मान्सुनपूर्व तयारी वेळेत पूर्ण करावी.
शेतकऱ्यांमध्ये जागृती करण्याकरीता खरीपपूर्व मेळावे आयोजित करण्यात यावेत. औषधांचा साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध असल्याची खात्री संबंधित विभागांनी करावी. पूरपरिस्थितीचा धोका लक्षात घेता नदी व नाल्यामधील गाळ काढून खोलीकरण करण्यात यावे. जिल्ह्यासाठी 500 आपदा मित्र आणि आपदा सखींची निवड करण्यात आली आहे. आपत्तीच्या काळात या आपदा मित्र व सखींची मदत घ्यावी, असे जिल्हाधिकारी म्हणाले.