एफडीएन बॅडमिंटन स्टेडियम व जिमचे ७ एप्रिल रोजी उद्घाटन
S
एफडीएन बॅडमिंटन स्टेडियम व
जिमचे ७ एप्रिल रोजी उद्घाटन
नागपूर :
शिरीनबाई नेटरवाला स्कूलमध्ये दोन राष्ट्रीय स्तरावरील बॅडमिंटन कोर्ट, एक प्रॅक्टिस कोर्ट आणि मल्टी फॅसिलिटी जिम असलेल्या एफडीएन बॅडमिंटन स्टेडियमचे उद्घाटन येत्या ७ एप्रिल रोजी नेटरवाला ग्रुपचे अध्यक्ष एफ.डी.नेटरवाला यांच्या हस्ते होणार आहे.
या निमित्त नेटरवाला ओपन बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा ११, १३ आणि १६ वर्षांखालील मुलांच्या एकेरी, पुरुष एकेरी व दुहेरी, ४० व ६० वर्षांवरील दुहेरी गटात होणार आहे. याशिवाय १५ वर्षांखालील मुली (एकेरी) व महिला दुहेरीतही स्पर्धा खेळली जाणार आहे. प्रत्येक गटातील विजेते, उपविजेते आणि उपांत्य फेरीतील दोन पराभूत खेळाडूंना आकर्षक रोख पुरस्कार दिले जाणार आहे. स्पर्धेचा समारोप ९ एप्रिल रोजी होणार आहे. तरुण बॅडमिंटनपटूंना प्रोत्साहन देणे व त्यांना अन्य खेळाडूंशी स्पर्धा करण्याची संधी देण्याच्या उद्देशाने, ही स्पर्धा सुरू करण्यात आली आहे. स्पर्धेचे संचालक व नेदरवाला ग्रुपचे उपाध्यक्ष अनोश नेटरवाला यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा आयोजित केली जाणार आहे.
अनोश नेटरवाला यांनी सांगितले की, नेटरवाला ग्रुपने मेटलर्जी, एरोस्पेस, एअरबोर्न सर्व्हे, तेल व वायू सेवा, पर्यावरण, तंत्रज्ञान आणि कृषी यासारख्या अनेक क्षेत्रांमध्ये आपली उपस्थिती दर्शविली आहे. नेटरवाला कुटुंबाच्या सीएसआर उपक्रमा अंतर्गत इंग्रजी माध्यमाची सीबीएसई शिरीनबाई नेटरवाला शाळा महाराष्ट्राच्या दुर्गम भागात तुमसर तालुक्यामध्ये माडगी गावात १९८२ मध्ये स्थापन करण्यात आली. भंडारा येथील ही पहिली सीबीएसई शाळा वंचित पार्श्वभूमीतील मुलांची काळजी घेत आहे आणि त्यांना कमीतकमी खर्चात सर्वोत्कृष्ट शिक्षण, अनेक अभ्यासक्रमेतर उपक्रम आणि क्रीडा उपक्रम प्रदान करीत आहे.
या शाळेत स्पोर्ट्स हब आणि कौशल्य विकास केंद्र निर्माण करण्याच्या उद्देशाने शाळेतर्फे विद्यार्थ्यांना विविध क्रीडा सुविधा पुरविण्यात येत आहेत. यात इंन्डोर बॅडमिंटन कोर्टसह जिम फुटबॉल मैदान, बास्केटबॉल कोर्ट, अँथलेटिक्स मैदान, टेनिस कोर्ट, व्हॉलीबॉल, खो-खो, कबड्डी, टेबलटेनिस, कॅरम, बुद्धिबळ व क्रिकेट मैदानाचा समावेश आहे. लवकरच शाळा आपल्या अभ्यासक्रमाचा भाग म्हणून कौशल्य विषयांचा समावेश करणार आहे.
आयोजन समितीमध्ये संचालक अनोश नेटरवाला, एफ.डी. नेटरवाला, परविन मेहता, संरक्षक लैला मेहता, कार्यकारी समिती सदस्य पी.बिमल, ऋषभ संतोष, रोहित धोत्रे, आशिष खेडीकर, जयंत गणेशे, विनोद तितिरमारे, संजय रॉय, सुदेश मेनन, आशिष मेनन, अभिजीत सेन, राजू जगन्नाथ, राम मोटवानी, रितेश अरोरा यांचा समावेश आहे.
?