श्री महालक्ष्मी जगदंबेच्या नवरात्रोत्सवाची तयारीला सुरूवात
नागपूर ( २२ सप्टेंबर २०२४ ) नागपूर जिल्ह्यातील जागृत शक्तीपीठ कोराडी येथील श्री महालक्ष्मी जगदंबा मंदिर तथा परिसर, मध्य भारतातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान, विदर्भातील सर्वोत्तम पर्यटन तीर्थक्षेत्र बनण्याच्या मार्गावर आहे. कोराडी येथे एकाच दिवसात तीन रूपात भाविकांना दर्शन देणाऱ्या श्री महालक्ष्मी जगदंबेच्या नवरात्रोत्सवाची तयारीला संस्थेने सुरूवात केली आहे.
नवरात्रोत्सवाबाबत भाविकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. कोराडीच्या श्री महालक्ष्मी जगदंबा मंदिरात दरवर्षी नवरात्रीमध्ये मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणातून भाविक हजेरी लावतात. कोराडी मंदिरात ३ ऑक्टोबरपासून १० दिवसीय अश्विन नवरात्रोत्सव सुरू होत आहे. यावेळी चार हजारांहून अधिक अखंड ज्योत प्रज्वलित करण्यात येणार आहेत. मंदिराच्या विकासात - हातभार लावण्यासाठी भाविकांनी आंखड ज्योत प्रज्वलित करावी, असे आवाहन मंदिर प्रशासनाने केले आहे. कोराडी येथील श्री. महालक्ष्मी जगदंबा मंदिर महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट तीर्थस्थळ तसेच पर्यटन क्षेत्र बनेल. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली मंदिर प्रशासन प्रयत्न करीत आहे. कोराडी येथील महालक्ष्मी जगदंबा मंदिर महाराष्ट्राच्या पर्यटन नकाशावर एक महत्त्वाचे केंद्र म्हणून ओळखले जाण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र शासन आणि कोराडी ग्रामस्थांचे सहकार्य महत्त्वाचे ठरले आहे.
★२५० कोटींतून मंदिर परिसराचा विकास★
कोराडी मंदिर परिसरात भाविकांच्या सोयीसाठी महाराष्ट्र शासनाने पहिल्या टप्प्यात उपलब्ध झालेल्या २५० कोटी रुपयांच्या निधींतर्गत विकासकामे पूर्ण झाली आहेत. त्यात मंदिराचे नूतनीकरण, शॉपिंग कॉम्प्लेक्स, दर्शन मंडप, दर्शन बारी, अखंड ज्योती केंद्र, भाविकांसाठी मंडप तसेच उद्यान आणि पार्किंग व्यवस्थेचा समावेश आहे.
मागीलवर्षी सुरू झालेले रामायण सांस्कृतिक केंद्र आकर्षणाचे केंद्र ठरले आहे. याद्वारे पर्यटकांना भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास आणि रामायणातील घटनांची माहिती मिळत आहे. संशोधक आणि शालेय विद्यार्थी तसेच भारतीय संस्कृतीचा अभ्यास करणाऱ्या पर्यटकांसह १ लाखांहून अधिक अभ्यागतांनी केंद्राला भेट दिली आहे.
दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील विकासकामांसाठी शासनाने २१४ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
★अत्याधुनिक पर्यटन क्षेत्र★
दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात १४० कोटी रुपयांची विकासकामे प्रगतीपथावर आहेत. मंदिर परिसरातील मालगुजारी तलावात हनुमानाची १५१ फूट उंचीची मूर्ती बसवणे, मुंबईतील ताराबोरा मत्स्यालयाच्या धर्तीवर १५० विविध प्रजातींच्या माशांचे संग्रहालय, डायनासोर पार्क, लहान मुलांचे क्षेत्र, साहसी उद्यान, न्यूझीलंडच्या मेज पार्क प्रमाणे उद्यान, आभासी वास्तविकता केंद्र (व्हर्चुअल थेयटर), सेव्हन डी थिएटरमध्ये देशातील सर्व शक्तीपीठांचे दर्शन होऊ शकेल. यासह ८ कोटी रुपये खर्चुन मंदिर परिसरातील सर्व पर्यटनस्थळांची फेरफटका मारणारी रेल्वेगाडी आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे. याशिव औष्णिक वीज निर्मिती आणि जलविद्युत निर्मिती या दोन्ही देणारे मॉडेल तयार केले जाणार आहे.