वन्यजीव सप्ताह निमित्त मानव वन्यजीव संघर्षावर विशेष चर्चासत्र संपन्न*
नागपूर : ( दि.३ ऑक्टोंबर २०२३ )वन्यजीव सप्ताह निमित्ताने नागपूर वन विभाग (प्रा.), सामाजिक वनीकरण विभाग, नागपूर आणि पेंच व्याघ्र प्रकल्प, महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. सप्ताहाच्या तिसऱ्या दिवशी आज ३ ऑक्टोबर रोजी नागपूर येथे मानव-वन्यजीव संघर्षावर विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आलेले होते.
या चर्चासत्राच्या उद्घाटन प्रसंगी राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) मा. श्री शैलेश टेंभुर्णीकर तसेच राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) मा. श्री महिप गुप्ता, श्रीमती श्रीलक्ष्मी ए. वनसंरक्षक, नागपूर, डॉ. प्रभू नाथ शुक्ल, क्षेत्र संचालक, पेंच व्याघ्र प्रकल्प, नागपूर आणि डॉ. भारतसिंह हाडा, उपवनसंरक्षक, नागपूर उपस्थित होते. चर्चासत्राच्या अनुषंगाने विविध अशासकीय संस्थांचे प्रतिनिधी, विविध माध्यमांचे पत्रकार, प्राध्यापक, वन्यजीव कायदेविषयक जाणकार आणि वन्यजीव क्षेत्रातील अभ्यासकांना निमंत्रित करण्यात आले होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलताना श्री. शैलेश टेंभुर्णीकर यांनी मानव वन्यजीव संघर्षाचे रूपांतर मानव वन्यजीव सुसंवादात व्हावे अशी अपेक्षा व्यक्त करताना संरक्षित क्षेत्राबाहेर असणाऱ्या वाघ आणि बिबट यांच्यावर चर्चासत्रादरम्यान विशेष चर्चा करण्याचे आवाहन उपस्थितांना केले. राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) मा. श्री महिप गुप्ता यांनी उपस्थितांसमोर मानव वन्यजीव संघर्षाच्या उद्देशाने सादरीकरण सादर केले.
चर्चासत्रासाठी उपस्थितांचे चार मुख्य विषयाच्या अनुषंगाने गट करून चर्चासत्र घडवण्यात आले आणि त्यावर सुसंवाद करण्यात आला. या गटांच्या विषयांमध्ये वन्यजीव विषयक जनजागृती, नवीन अपेक्षित धोरणात्मक निर्णय घेणे, मानव वन्यजीव संघर्ष होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाय आणि उपशमन (मिटीगेशन स्ट्रक्चर) ची निर्मिती आणि मानव वन्यजीव संघर्षातील नवीन तांत्रिक संसाधनांचा उपयोग इत्यादी महत्त्वाच्या विषयांचा समावेश होता. या चर्चासत्राचे तज्ञ म्हणून राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) मा. श्री महिप गुप्ता, निवृत्त वन अधिकारी, श्री गिरीश वशिष्ठ, श्री. किशोर मिश्रीकोटकर आणि आशिष झा, (विभाग प्रमुख, प्राणीशास्त्र विभाग, हिस्लोप कॉलेज) यांनी कार्य केले. ४ ऑक्टोबर रोजी शालेय विद्यार्थ्यांसाठी आंतरशालेय वन्यजीव विषयक प्रश्न मंजुषा आणि वन्यजीव विषयक चित्रपटाचे आयोजन गोल्डन लिफ बँक्वेट हॉल, त्रिमूर्ती नगर, नागपूर येथे करण्यात आलेले आहे