सुनील केदार यांच्याकडून बँक घोटाळ्यातील पैश्याच्या वसुलीसाठी बेमुदत ठिय्या आंदोलन.
★ नागपुर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळा पिडीत शेतकरी व खातेदार संघटना तर्फे बेमुदत ठिय्या आंदोलन.
नागपूर ( दि. २ ऑगस्ट २०२४ ) नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या घोटाळ्यात न्यायालयाने आरोपी ठरविलेले राज्याचे माजी मंत्री काँग्रेसचे सुनील केदार यांच्याकडून बँक घोटाळ्यातील पैश्याच्या वसुलीसाठी नागपुर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळा पिडीत शेतकरी व खातेदार संघटना, तर्फे सावनेर गांधी चौक येथे बेमुदत ठिय्या आंदोलन सुरु करण्यात आले. बँकेचे तत्कालीन अध्यक्ष सुनील केदार यांच्याकडून घोटाळ्याचे १५३ कोटी व व्याजाचे १४४४ कोटी रुपयांची वसुली करून पिडीत शेतकरी व खातेदारांना २ महिन्यात वाटप करण्यात यावे, ही प्रमुख मागणी पिडीत आंदोलनकर्त्यांची आहे. सोबतच वसुलीच्या कारवाईसाठी राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह निर्माण केल्या जात आहे.
बँक घोटाळ्यात न्यायालयाने दोषी ठरवलेल्या सुनील केदार यांच्याकडून वसुलीची कारवाई करावी यासाठी भाजपाचे प्रवक्ते तसेच ओबीसी मोर्चा प्रदेश प्रभारी डॉ. आशिषरा देशमुख यांच्या नेतृत्वात पिडीत शेतकरी, खातेदार व नागरिक या ठिय्या आंदोलनात सहभागी झाले आहेत.
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे, डॉ राजीव पोद्दार, मनोहर कुंभारे, प्रकाश टेकाडे, ओमप्रकाश कामडी, दिनेश ठाकरे, दिलीप धोटे, विजय देशमुख, बँकेचे ठेवीदार व्यापारी, शेतकरी, खातेदार, नागरिक यावेळी हजारोंच्या संख्येत उपस्थित होते. मान्यवरांनी आपले मत यावेळी व्यक्त केले. आंदोलनाच्या सुरुवातीला पिडीत शेतकरी व खातेदारांचा बैलबंडी धडक मोर्चा काढण्यात आला आणि संपत खलाटे, उपविभागीय अधिकारी व उपविभागीय दंडाधिकारी, सावनेर यांना हजारोंच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले.