घोगरा महादेव येथे भक्तांची गर्दी, लाखो भक्तांनी घेतले महादेवाचे दर्शन
◆ पेंच नदीच्या पात्रात लाखो भाविकांची मांदियाळी तीन दिवस चालणार यात्रा
पारशिवनी: ( ८ मार्च २०२४ ) पारशिवनी तालुक्यातील घोगरा महादेव मंदिरात शुक्रवार ८ मार्च रोजी महाशिवरात्रीच्या अनुषंगाने लाखों भक्तांनी हजेरी लावत हर हर महादेवचा गजर केला. एवढी मोठी भक्तांची संख्या पाहता पारशिवनी पोलिसांनी तगडा बंदोबस्त येथे ठेवला होता.
पारशिवनी तालुक्यातील घोगरा महादेव हे तिर्थस्थळ संपूर्ण जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. पेंच नदीच्या मध्यभागी असलेल्या या मंदिरात दरवर्षी महाशिवरात्रीला यात्रा भरते. पर्यटकांना तर घोगरा सर्वात आवडणारे क्षेत्र आहे. यामुळेच हे क्षेत्र महादेव मंदिराने प्रसिद्ध झाले आहे. पेंच नदीच्या पात्रातील मोठ्या दगडांमध्ये घोगरा महादेव वसलेला आहे. याच खडकांवर मंदिर तयार केले आहे. तसे पाहता येथील मंदिर हे पूर्णतः निसर्गनिर्मित असल्याने त्याचे महत्त्व आणखीनच वाढले आहे. परिणामी महाराष्ट्रच नव्हे तर मध्यप्रदेश, छत्तीसगड राज्यातील भाविकही येथे दर्शनासाठी येतात. भक्तांची वाढती संख्या पाहता पोलिस निरीक्षक राहुल सोनवाने, पोलिस निरीक्षक पद्मश्री पाटील, पृथ्वीराज चव्हाण, राकेश बंधाटे, गजानन उकेबोंदरे, अक्षय बुटले यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
घोगरा महादेव मंदिरात येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून घोगरा महादेव देवस्थान पंचकमेटीचे अध्यक्ष संपतराव थोटे, सुभाष केने, शंकर रोकडे, राजेश थोटे, मधुकर थोटे, शेषराव आदेवार, हरीभाऊ गणभोज, सुरेश सातपैसे, नरेश बडगे, आकाश चिंधेकर, शुभम बडगे, प्रफुल छापेकर, रमेश नान्हे यांनी अथक परिश्रम घेतले.