प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन बल प्रमुख) या पदाचा अतिरीक्त कार्यभार शोमीता विश्वास यांनी स्विकारला
नागपूर : ( दि. ३१ जुलैं २०२४ ) महाराष्ट्र राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन बल प्रमुख) या पदाचा अतिरीक्त कार्यभार शोमीता विश्वास, भा. व. से. यांनी आज मावळते प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन बल प्रमुख शैलेश टेंभूर्णीकर यांचेकडून स्वीकारला. शोमीता बिश्वास (भावसे) या १९८८ च्या बॅचच्या महाराष्ट्र राज्यातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या भारतीय वनसेवेतील वरिष्ठ अधिकारी आहेत.
प्रधान मुख्य वनसंरक्षक वनबल प्रमुख या पदाचा कार्यभार स्वीकारण्यापूर्वी त्यांनी प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी महा कॅम्पा, महाराष्ट्र राज्य नागपूर या पदावर काम केले आहे. राज्य आणि केंद्राशी कार्यक्षमतेने समन्वय साधत त्यांनी कॅम्पा योजना राज्यात अत्यंत प्रभावीपणे राबविलेली आहे.
याशिवाय त्यांनी भारत सरकारमध्ये विविध वरिष्ठ पदावर अत्यंत महत्त्वाचे काम केलेले आहे. त्यामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळ, आयुष मंत्रालय दिल्ली, सहसचिव कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकार, दिल्ली या महत्त्वाच्या पदांचा समावेश होतो. राज्य व केंद्रीय स्तरावरती अत्यंत महत्त्वाच्या विविध पदांवरती काम केल्याने शोमीता विश्वास यांना प्रशासन सक्षमतेने चालवण्याचा प्रदीर्घ अनुभव आहे. सत्कारमुर्ती प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन बल प्रमुख) श्री. शैलेश टेंभुर्णीकर तसेच वन अभियंता,
महाराष्ट्र राज्य श्री. भुरे यांना वनभवन, नागपूर कार्यालयाच्या वतीने शाल श्रीफळ देऊन निरोप देण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षा श्रीमती शोमीता बिश्वास यांनी सत्कारमुर्तीबद्दल गौरोद्गार काढले व त्यांना भविष्यातील पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या तसेच यावेळी श्री. महिप गुप्ता, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव), श्री. श्रीनिवास राव, प्रधान मुख्य वनसंरक्षक (उत्पादन व व्यवस्थान), श्री. कल्याणकुमार, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (अर्थसंकल्प नियोजन व विकास), श्री. नरेश झुरमुरे, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा केंद्रस्थ अधिकारी यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच सत्कारमुर्ती श्री. शैलेश टेंभुर्णीकर व श्री. भुरे यांनी याप्रसंगी मनोगत व्यक्त केले. यावेळी भारतीय वनसेवा व महाराष्ट्र वनसेवेचे सर्व वरिष्ठ वनअधिकारी व कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व आभार श्री. राजेश मेश्राम यांनी केले.