ऑक्सीजन बर्ड पार्कचे लोकार्पण शनिवारी*
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प*
नागपूर: ( दि. २६ सप्टेंबर २०२४ ) केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या ऑक्सीजन बर्ड पार्कचे लोकार्पण येत्या शनिवारी २८ सप्टेंबरला दुपारी १२ वाजता ना. नितीन गडकरी यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. वर्धा मार्गावरील जामठा क्लोव्हर लिफ येथे हा ऑक्सीजन पार्क साकारण्यात आला आहे.
या कार्यक्रमाला रामटेक लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्यामकुमार बर्वे, आमदार प्रवीण दटके, आमदार अभिजित वंजारी, भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे, आमदार सुधाकर अडबाले, आमदार कृपाल तुमाने, आमदार अनिल देशमुख, आमदार नितीन राऊत, आमदार कृष्णा खोपडे, आमदार विकास कुंभारे, आमदार मोहन मते, आमदार विकास ठाकरे, आमदार समीर मेघे, आमदार आशीष जयस्वाल, आमदार टेकचंद सावरकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहेत
ना. गडकरी यांच्या संकल्पनेतून आणि भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या पुढाकारातून नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वर ऑक्सीजन बर्ड पार्क साकारण्यात आला आहे. १४.३२ कोटींचा हा प्रकल्प जवळपास २० एकरमध्ये साकारण्यात आला आहे. याठिकाणी केवळ पक्ष्यांसाठी विशिष्ट फळझाडांची लागवड करण्यात आली आहे. या उद्यानाचे महत्त्व केवळ ऑक्सिजन (प्राणवायू) देणारा परिसर एवढेच नाही. तर पक्ष्यांच्या विविध प्रजातींसाठी हा परिसर आश्रयस्थान म्हणून उपयुक्त ठरणार आहे. विशेष म्हणजे 8,104 प्रकारच्या वनस्पतींसह 11 हेक्टर क्षेत्रफळावर ऑक्सिजन पार्क विकसित करण्यात आला आहे. या प्रकल्पात नैसर्गिक तळ्यांनाही समाविष्ट करून घेण्यात आले आहे.
या उद्यानात फूड कोर्ट, प्रसाधनगृहे, चालण्याचे मार्ग, जॉगिंग आणि सायकलिंग ट्रॅक, वॉचटॉवर, ॲम्फीथिएटर प्लॅटफॉर्म आणि मुलांसाठी विशेषक्रीडा क्षेत्र यासह विविध प्रकारच्या सुविधा आहेत. प्रवेशद्वारावर आकर्षक आर्किटेक्चरल डिझाईनचे आहे. विशेष म्हणजे हे उद्यान विविध प्रकारची फळे देणाऱ्या वनस्पतींनी समृद्ध आहे. जांभळे, आंबा, पेरू, बेल, चिंच, अंजीर, खिरणी, पिंपळ, सीताफळ, आवळा ही झाडे फक्त पक्ष्यांसाठी संरक्षित आहेत.