नागपूर जिल्ह्यातील आशा सेविकांकरिता मोबाईल वितरण
नागपूर : ( दि. २ ऑगस्ट २०२४ ) जिल्ह्यातील आशा सेविकांकरिता मोबाईल वितरण तसेच पारशिवनी तालुक्यातील घाटपेंढरी व काटोल तालुक्यातील झिल्पा व भोरगड येथील नवनिर्मित प्राथमिक आरोग्य केंद्र इमारतीचा लोकार्पण सोहळा राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडला. आशा सेविकांना मोबाईल व टॅब मिळाल्याने त्यांचे ग्रामीण भागात आरोग्य सेवेचे काम गतिमान होऊन अधिकाधिक माता-भगिणी, बालकांसह नागरिकांना सरकारी आरोग्य सेवांचा लाभ कमीत कमी वेळेत मिळेल. सोबतच तीन नवीन आरोग्य केंद्र नागरिकांच्या सेवेत सुरू झाल्याने नागपूर जिल्ह्यातील आरोग्य सेवेचा विस्तार झाला आहे. हे दोन्ही उपक्रम देवेंद्रजी यांच्या पुढाकाराने प्रत्यक्षात उतरले आहेत.
यावेळी जि.प.च्या अध्यक्ष मुक्ताताई कोकड्डे, रामटेकचे खासदार श्यामकुमार बर्वे, आ. अनिल देशमुख, आ. आशिष जयस्वाल, आ. डॉ. परिणय फुके, आ. टेकचंद सावरकर, आ. अभिजित वंजारी, आ. सुधाकर आडबले, आ. कृपाल तुमाने, यांच्यासह जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा व आरोग्य विभागातील अधिकारी व मोठ्या संख्येने आशा सेविका उपस्थित होत्या.