बुद्ध जयंतीनिमित्त आजपासून ऐतिहासिक धम्म पदयात्रेला सुरुवात
नागपूर : ( दि. ५ में २०२३ ) तथागत भगवान गौतम बुद्धांचा समता, बंधुता आणि शांतीचा संदेश जगभर पोहोचावा, तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भारत बौद्धमय करण्याचा संकल्प पूर्ण करण्यासाठी, बुद्धांचे धम्मचक्र गतिमान करण्याच्या उद्देशाने दीक्षाभूमी ते लेह लद्दाखदरम्यान धम्म पदयात्रेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती थायलंडचे मुख्य भंते पहरा थेपारीया तीसुथी व गगन मलिक यांनी रवी भवन येथे आयोजित पत्रपरिषदेत दिली.
धम्म पदयात्रेविषयी विस्तृत माहिती देताना ते म्हणाले, वैशाख पौर्णिमा म्हणजेच बौद्ध जयंतीचे औचित्य साधून गगन मलिक फाऊंडेशन आणि आश्रय फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पवित्र दीक्षाभूमी ते लेह लद्दाखपर्यंत धम्म पदयात्रा उद्या शुक्रवार ५ मे रोजी दीक्षाभूमी येथून सुरुवात होणार आहे. वर्धा मार्गावरील उर्वेला कॉलनी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह येथे दुपारी ३ वाजता श्रामनेर बनविण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. ६ ते ८ मे असे दोन दिवस सिहोरा कन्हान येथे श्रामनेर प्रशिक्षण झाल्यानंतर जवळपास १०० श्रमनेरांना राजगीर येथे नेण्यात येईल. तेथून वेणुवन आणि वेणुवंन ते बुद्धगया, बुद्धगया ते धर्मशाला आणि धर्मशाला येथून धम्म पदयात्रेला सुरुवात होईल. या धम्म पदयात्रेत भारतातील १०० तर थायलंडचे १०० भंते सहभागी होतील. ही धम्म पदयात्रा १५ जुलै रोजी लेह लद्दाख येथे पोहोचेल व तेथे समारोप होईल.
दीक्षाभूमी ते धर्मशाला दरम्यानचा श्रामणेर यांचा प्रवास हा बसद्वारे होईल. तर धर्मशाला ते लेह लद्दाख दरम्यान एक महिन्याची धम्म पदयात्रा राहील. बुद्धगया येथे थायलंड येथील १०० भंते व बौद्ध धर्मगुरू पदयात्रेत सामील होतील.
भारतातून जवळपास १०० श्रामणेर बनविण्याचा गगन मलिक फाऊंडेशनचा संकल्प आहे. यासाठी थायलंड येथील दहा भंतेंचे डेलिगेशन नागपुरात दाखल झाले आहे. डॉ. आंबेडकर सभागृह येथे थायलंडच्या पद्धतीने श्रामनेर बनविण्याची प्रक्रिया ५ मे रोजी सुरू होईल.
दरम्यान झुंड चित्रपटाचा मुख्य अभिनेता अंकुश याचा पुष्पगुच्छ व बौद्ध मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला.
पत्रपरिषदेला थायलंडचे भंते कंतराथाना, भंते रुपेश, भंते प्राखंती बरोम, भंते थीयाछयो, भंते प्रार्थनासून, चीतिको भिकू, प्रहरा महाछाटवना यांच्यासह गगन मलिक फौंडेशनचे राष्ट्रीय समन्वयक नितीन गजभिये, विकास तायडे, प्रकाश कुंभे, स्मिता वाकोडे, गुणवंत सोनटक्के, वर्षा मेश्राम, रवी सवाईथुल, नरेश महाजन व गगन मलिक फौंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते.