अखेर कोंढाळीच्या निवडणुकीला उच्च न्यायालयाकडुन स्थगिती
◆ सलील देशमुख यांनी दाखल केली होती याचीका
नागपूर : ( द़ि. ७ ऑक्टोंबर २०२३ ) कोंढाळीला नगर पंचायतीचा दर्जा मिळाल्याने ग्राम पंचायतीची निवडणुक स्थगित करावी अशी मागणी अनिल देशमुख यांनी नगर विकास व राज्य निवडणुक आयोगाकडे केली होती. परंतु यावर कोणताही निर्णय न झाल्याने राष्ट्रवादीचे नेते जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात याचीका दाखल करुन कोंढाळी ची निवडणुक रद्द करण्याची विनंती केली होती. न्यायालयाने कोंढाळीसह जिल्हातील डिगडोह व निलडोह येथील निवडणुकीला अंतरीत स्थगीती दिली आहे.
कोंढाळी ग्राम पंचायतीला नगर पंचयतीचा दर्जा देण्याची मागणी होती. यावरुन या भागाचे आमदार अनिल देशमुख व जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख यांनी प्रयत्न करुन नगर पंचायतीचा दर्जा देण्यासाठी प्रयत्न सुरु केले. कोंढाळी ग्राम पंचायत मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असल्याने स्थानीक पदाधिकाऱ्यांनी सुध्दा याचा पाठपुरावा केला. अखेर २१ जुन २०२३ ला कोंढाळी ग्राम पंचायतीला नगर पंचायतीचा दर्जा देण्यात आला. परंतु राज्य नगर विकास खात्याकडुन ही माहिती निवडणुक आयोगाला न दिल्याने राज्यात जाहीर झालेल्या ग्राम पंचायत निवडणुकीमध्ये नागपूर जिल्हातील कोंढाळी सह निलडोह व डिगडोह येथील निवडणुका जाहीर करण्यात आल्या होत्या.
नगर पंचायतीचा दर्जा मिळाल्याने ग्राम पंचायतीची निवडणुका घेणे व्यव्हारीक नाही यामुळे ग्राम पंचायत निवडणुक घेवू नये अशी मागणी अनिल देशमुख यांनी निवडणुक आयोगासह नगर विकास खात्याला केली होती. परंतु यावर कोणताच निर्णय न झाल्याने सलील देशमुख यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात त्यांनी याचीका दाखल करुन ही निवडणुक रद्द करण्याची मागणी केली. यावर शुक्रवारी न्यायमुर्ती ए.एस.चांदुरकर व न्यायमुर्ती वृशाली जोशी यांच्या कोर्टात सुनावणी झाली. यावर कोंढाळीसह निलडोह व डिगडोह येथील ग्राम पंचायत निवडणुकीला अंतरीम स्थगीती दिली. तसेच नगर पंचायतची अधिसुचना कधी काढणार यासाठी १० ऑक्टोंबरला नगर विकास व निवडणुक आयोगाला कोर्टासमोर हजर राहण्याचे आदेश दिले आहे. याचिकाकर्ते सलील देशमुख व कोंढाळीचे सरपंच केशव धुर्वे यांच्या वतीने ॲड. रितेश धावडा यांनी बाजु मांडली. कोर्ट कामात उपसरपंच स्वप्नील व्यास व सदस्य संजय राउत यांनी सहकार्य केले.
हे राज्य शासनाचे अपयश – सलील देशमुख
नगर पंचायत करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यानंतर त्याची माहिती नगर विकास ने निवडणुक आयोगाला कळविणे क्रमप्राप्त आहे. परंतु नगर विकास खात्याने तसे कळविले नाही आणि ग्राम विकास खात्याने त्यांची प्रकीया पुर्ण केली नाही. यामुळेच कोंढाळीसह निलडोह व डिगडोह येथील ग्राम पंचायतची निवडणुक येथील नागरीकांवर लादण्यात आली होती. शेवटी आम्हाला उच्च न्यायालयात धाव घ्यावी लागली. न्यायालयाच्या निकालाचे मी स्वागत करतो. परंतु निवडणुक लागणे हे राज्य शासनाचे अपयश असल्याची टिका सलील देशमुख यांनी केली आहे.