खासदार नवनीत राणा यांचा भाजपात प्रवेश*
• सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करणार - राणा
• पतंप्रधान मोदी यांच्या विकसित भारताच्या संकल्पाला साथ - चंद्रशेखर बावनकुळे
नागपूर: (दि. २७ मार्च २०२४) अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी बुधवारी रात्री उशीरा भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी हनुमानाची मूर्ती व पक्षाचा दुपट्टा घालून त्यांचे पक्षात स्वागत केले. नवनीत राणा अमरावती लोकसभा मतदारसंघातून भाजपाच्या उमेदवार म्हणून निवडणूक लढणार आहेत.
चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कोराडी येथील जनसंपर्क कार्यालयात त्यांचा पक्ष प्रवेश झाला. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे पती आमदार रवी राणा यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. खा. राणा म्हणाल्या की, मोदीजींच्या विचारावर मी मागील अनेक वर्षांपासून काम करीत आहे. मला अमरावती मतदारसंघातून उमेदवारी दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, राज्याचे नेते तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे आभार व्यक्त करते. भारतीय जनता पक्षात एक सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करणार आहे. विरोधी पक्षात असताना ३३ महिने लढा दिला, आमची विचारधारा एक असल्याने आम्ही वेगळे होऊ शकत नाही. भाजपाच्या ४०० पार च्या संकल्पात अमरावतीची खासदार म्हणून मी एक असेल, असेही त्या म्हणाल्या.
प्रदेशाध्यक्ष श्री बावनकुळे म्हणाले, पतंप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारताच्या संकल्पाला साथ देण्यासाठी खासदार नवनीत राणा यांनी त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश घेतला आहे. त्यांचा पक्ष प्रवेश भाजपा संघटनेला मजबुती प्रदान करणारा असेल. नवनीत राणा या अमरावती नव्हे तर विदर्भ व महाराष्ट्राच्या नेत्या असतील.
यावेळी विदर्भ संघटक डॉ. उपेंद्र कोठेकर, खा. अनिल बोंडे, खा. सुनील मेंढे, आ. प्रवीण पोटे, आ. रवी राणा, शिवराय कुळकर्णी, जयंत डेहनकर यांच्यासह अमरावतीतील भाजपाचे प्रमुख पदाधिकारी व राणा यांचे असंख्य समर्थक उपस्थित होते.