विकासाचे संपूर्ण श्रेय नागपूरच्या जनतेला
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी; दक्षिण, पूर्व व उत्तर नागपुरात जाहीर सभा*
*नागपूर - गेल्या दशकात नागपूर शहराचे चित्र वेगाने बदलले. रस्ते चांगले झाले. ७५ टक्के जनतेला १२ ते २४ तास पिण्याचे पाणी मिळत आहे. आरोग्य आणि शिक्षणाच्या क्षेत्रात मोठ्या सुविधा निर्माण झाल्या आहेत. शहराचा चौफेर विकास झाला आणि सर्वांगीण विकासाच्या दिशेने आपण वाटचाल केली आहे. जनतेने जाती-पातीचा विचार न करता आम्हाला निवडून दिले आणि सेवा करण्याची संधी दिली. त्यामुळे शहराच्या विकासाचे संपूर्ण श्रेय नागपूरकरांना जाते, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी आज (बुधवार) व्यक्त केले. जेवढे काम आजपर्यंत झाले आहे, त्याच्या तिप्पट काम पुढील पाच वर्षांत होणार आहे, असा विश्वासही ना. श्री. गडकरी यांनी व्यक्त केला.*
दक्षिण नागपूरचे भाजप-महायुतीचे उमेदवार मोहन मते, पूर्व नागपूरचे उमेदवार कृष्णा खोपडे आणि उत्तर नागपूरचे उमेदवार डॉ. मिलिंद माने यांच्या प्रचारार्थ ना. श्री. नितीन गडकरी यांच्या सभा आयोजित करण्यात आल्या. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष जितेंद्र कुकडे, माजी आमदार अनिल सोले, नरेंद्र बोरकर यांची उपस्थिती होती.
ते म्हणाले, ‘गेल्या दहा वर्षांमध्ये नागपूर मोठ्या प्रमाणात बदलले आहे. एकेकाळी शहरातील रस्ते फार अरुंद होते. आज शहरातील रस्ते चांगले झाले आहेत. पूर्वी पिण्याच्या पाण्याची समस्या होती. आपण ९३ जलकुंभ बांधायला घेतले. ८३ जलकुंभ पूर्ण झाले आहेत. शहरातील ७५ टक्के जनतेला १२ ते २४ तास पाणी मिळत आहे. पुढच्या काही दिवसांमध्ये शहरातील पाण्याचे टँकर पूर्णपणे बंद होतील.’ म्हाळगी नगर चौकापासून शताब्दी चौकाच्या पलीकडे जाणारा एक उड्डाणपूल तयार होणार आहे, अशी माहितीही ना. श्री. गडकरी यांनी दिली.
*ते दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतील*
आम्ही कधीही जातीयवादाचे राजकारण केले नाही. पण आमच्याबद्दल खोटा प्रचार झाला. आम्ही संविधान बदलणार आहोत, असे काँग्रेसने लोकांना सांगितले. आम्ही संविधान बदलणार नाही आणि कुणाला बदलू देणार नाही. ताजबाग, दीक्षाभूमीचा विकास आमच्या सरकारने केला. मुस्लिम असो किंवा दलित असो, योजनांचा फायदा सर्वांना दिला. मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा नक्कीच प्रयत्न होईल. पण मतदारांनी काँग्रेसच्या खोट्या प्रचाराला बळी पडू नये, असे आवाहन ना. श्री. गडकरी यांनी केले.