काँग्रेस मधून निष्कासित डाॅ. आशिष देशमुख यांचा पुन्हा भाजपामध्ये प्रवेश
★उ द्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर खंजीराने नव्हे, तर तलवारीने हल्ला केला.
नागपूर : ( १९ जून २०२३ ) कधी इकडून तिकडे तिकडून इकडे पक्ष प्रवेश करून त्याच पक्षा विरूध्द बंड पुकारणारे डॉ. आशिष देशमुख यांनी रविवार १८ जून रोजी पुन्हा भाजपात प्रवेश केला.
कोराडी येथे आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, डॉ. राजीव पोतदार, जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये यांच्या उपस्थितीत डॉ. आशिष देशमुख यांनी भाजपात प्रवेश केला. काँग्रेस पक्षातील ध्येय धोरणे न पटल्याने मी माझ्या चुका विसरून परत एकदा भाजपात आलो आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
आपल्या भाषणात आशिष देशमुख यांनी काँग्रेस तसेच गांधी परिवारावर निशाणा साधला. कर्नाटक निवडणुकीदरम्यान ओबीसींबाबत केलेल्या वक्तव्याबद्दल राहुल गांधी यांनी माफी मागावी, अशी सरळ मागणी मी केली होती. मात्र त्यांनी माफी मागितली नाही. त्याच राहुल गांधी यांना राफेलबाबत कोर्टाने फटकारले असता त्यांनी गुपचूप माफी मागितली. मी ओबीसींबाबत अपमानास्पद वक्तव्य केल्याबद्दल माफी मागा असे म्हटले होते. माफी सोडा त्यांनी मलाच पक्षातून निलंबित केले. २०१९ च्या विधानसभा निवडणूक निकालानंतर उ द्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर खंजीराने नव्हे, तर तलवारीने हल्ला केला. यामुळे आगामी निवडणुकीत विदर्भ त्यांना धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही. उद्धव ठाकरे हे विदर्भात फेसबुकशिवाय दिसले नाहीत. तेव्हाही मी याबाबत आवाज उठवला होता. महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सत्तेत आले, तेव्हापासून शेतकरी तथा सामान्यांच्या हिताचे अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. शेतकऱ्यांना भरघोस मदत दिली आहे. उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात सर्व कामे ठप्प झाली होती. आता त्या कामांना वेग आला आहे. काँग्रेस पक्ष सामान्यांचा राहिलेला नाही. यामुळे मी भाजपात आलो. विदर्भात आपण २० ते २५ आमदारांना निवडून आणण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचेही आशिष देशमुख यांनी स्पष्ट केले. मी एक सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करेल असेही त्यांनी म्हटले.