काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगें यांची जाहिर सभा आज इंदोरा मैदानात
डॉ. नितीन राऊत यांच्या निवडणूक प्रचार सभेला करणार संबोधित*
नागपूर, (दि. ८ नोव्हेंबर २०२४) उत्तर नागपूर विधानसभा क्षेत्रातील महाविकास आघाडीचे उमेदवार माजी पालकमंत्री आमदार डॉक्टर नितीन राऊत यांच्या प्रचारार्थ आज ९ नोव्हेंबर रोजी सांयकाळी ६ वाजता इंदोरा मैदान, जरीपटका रोड येथे काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची जाहिर सभा आयोजित करण्यात आली आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणाला वेग आला आहे. यातच काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे महाराष्ट्रातील नागपूर शहरात उत्तर नागपूर मतदार क्षेत्रातील काँग्रेसचे उमेदवार डॉ. नितीन राऊत यांच्या निवडणूक सभेला संबोधित करण्याकरिता शनिवार, ९ नोव्हेंबर ला नागपूर दौऱ्यावर येणार आहेत.
लोकसभेचे विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांनी नुकतेच महाराष्ट्र दौऱ्यावर बुधवारला नागपुरच्या संविधान सन्मान संमेलनात संबोधित केले होते.
डॉ. नितीन राऊत यांच्या निवडणूक प्रचार सभेतून मल्लिकार्जुन खरगे हे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकणार आहेत. सकाळी विमानाने नागपूर येथे आल्यावर ११ वाजता पवित्र दीक्षाभूमी येथे संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतील. दुपारी तिवसा येथील सभेला संबोधित करुन सायंकाळी ६ वाजता उत्तर नागपूरातील ऐतिहासिक इंदोरा मैदानात डॉ. नितीन राऊत यांच्या निवडणूक प्रचार सभेला संबोधित करून रात्रीच्या विमानाने मुंबई ला परततील.