सर्वसामान्यांना हक्काची घरे देण्यास शासन वचनबद्ध - गृहनिमार्ण मंत्री
★ रियल इस्टेट क्षेत्रासमोरील अडचणी सोडवू*
नागपूर: ( दि.६ ऑक्टोंबर २०२३ ): सामान्य माणसाला हक्काचे घर मिळावे यासाठी राज्य शासन वचनबध्द असून त्यादिशेने कार्य सुरू आहे. तसेच, इतर मागास विकास विभागाच्यावतीने राज्यात दहा लाख घरे बांधण्याचे कार्य सुरू आहे. या दोन्ही अभियानामध्ये रियल इस्टेट क्षेत्रातील कंपन्यांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन करत या क्षेत्रातील कंपन्यासमोर असलेल्या अडचणी दूर करण्यासाठी लवकरच बैठक घेण्यात येईल, असे प्रतिपादन गृहनिर्माण, इतर मागासवर्ग बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी आज येथे केले.
येथील रेशीमबाग मैदानावर नॅशनल रियल इस्टेट डेव्हलपमेंट कॉन्सिल- (नरेडको) विदर्भ यांच्यावतीने आयोजित होमेथॉन प्रॉपर्टी एक्सपोचे उद्घाटन श्री. सावे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. आमदार मोहन मते, नरेडकोचे अध्यक्ष घनश्याम ढोकणे, उपाध्यक्ष ब्रिजमोहन तिवारी आदी यावेळी उपस्थित होते.
श्री. सावे म्हणाले, प्रधानमंत्री आवास योजना व राज्य शासनाच्या विविध घरकुल योजनांद्वारे गोरगरिबांना हक्काची घरे उपलब्ध करून देण्यात येत आहेत. देशात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजीत पवार यांच्या नेतृत्वात सर्वसामान्यांना हक्काची घरे देण्यासाठी केंद्र व राज्य शासन कार्यरत आहे. यात रियल इस्टेट कंपन्यांचेही सहकार्य लाभत असल्याचे सांगून याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. रियल इस्टेट क्षेत्रातील कंपन्यांसमोर असलेल्या विविध अडचणी सोडविण्यासाठी शासन सकारात्मक आहे. या महिन्याअखेरीस मुंबई येथे संबंधित मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन या अडचणींसंदर्भात मार्ग काढण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
इतर मागास प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकासाठी इतर मागासवर्ग बहुजन कल्याण विभागाच्यावतीने ‘मोदी आवास घरकुल योजना’ राबविण्यात येत असून या योजनेंतर्गत राज्यात 10 लाख घरे बांधण्यात येणार आहेत. जिल्हा परिषद व अन्य विभागाच्यावतीने ग्रामीण व शहरी भागांमध्ये ही घरे बांधण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. नागपूर शहरात पायाभूत सुविधांचे जाळे मोठ्या प्रमाणात निर्माण झाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. या शहरात झोपडपट्टी विकास प्राधिकरण (एसआरए) आणि महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचे (म्हाडा) विविध प्रकल्प राबविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणामधील (महारेरा) रिक्त पदे भरण्यात येतील आणि महारेरामध्ये प्रलंबित असलेले विविध प्रकरणे मार्गी लावून या क्षेत्राला गती देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. होमेथॉन प्रॉपर्टी एक्सपोमध्ये विदर्भासह राज्यातील एकूण 70 रियल इस्टेट कंपन्या सहभागी झाल्या असून दि. 6 ते 8 ऑक्टोबर 2023 पर्यंत हा एक्सपो सर्वांसाठी खुला राहणार आहे.
तत्पूर्वी, श्री सावे यांनी रेशीम बाग परिसरातील हेडगेवार स्मारकाला भेट दिली. त्यांनी यावेळी डॉ. केशवराव हेडगेवार आणि माधवराव गोळवलकर गुरुजी यांच्या समाधीला अभिवादन केले. हेडगेवार स्मारक समितीचे व्यवस्थापक विकास तेलंग उपस्थित होते.