विभागीय अधिस्विकृती समितीच्या अध्यक्षपदी रमेश कुलकर्णी
नागपूर, दि. 8 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या नागपूर विभागीय अधिस्विकृती समितीच्या अध्यक्षपदासाठी दैनिक पुण्यनगरीच्या विदर्भ आवृत्तीचे संपादक रमेश कुलकर्णी यांची आज सर्वसंमतीने निवड करण्यात आली.
नागपूर विभागीय अधिस्विकृती समितीची पहिली बैठक जुने सचिवालय येथील माहिती विभागाच्या संचालक कार्यालयात आज आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस समितीचे सदस्य अविनाश भांडेकर, रमेश कुलकर्णी, नरेंद्र पुरी, शिरीष बोरकर, प्रफुल्ल व्यास तसेच समितीचे निमंत्रक तथा सदस्य सचिव नागपूर-अमरावती विभागाचे माहिती संचालक हेमराज बागूल उपस्थित होते.
विभागीय अधिस्विकृती समितीच्या सदस्यांची शासनाकडून निवड करण्यात आली आहे. या समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडीची प्रक्रिया आज पार पडली. अध्यक्षपदासाठी श्री. कुलकर्णी यांचे नाव नरेंद्र पुरी यांनी सुचविले तर अविनाश भांडेकर व प्रफुल्ल व्यास यांनी त्यास अनुमोदन दिले. या प्रस्तावाचे शिरीष बोरकर यांनी स्वागत केले. त्यानुसार अध्यक्षपदी श्री. कुलकर्णी यांची निवड करण्यात आली.
राज्य अधिस्विकृती समितीचे सदस्य प्रदीप मैत्र, सविता हरकरे, उन्मेष पवार यांनी नवनियुक्त अध्यक्षांचे स्वागत केले. प्रारंभी संचालक श्री. बागूल यांनी नवनियुक्त सदस्यांचे स्वागत केले. सुत्रसंचालन माध्यम समन्वयक अनिल गडेकर यांनी केले तर जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके यांनी आभार मानले.
रमेश कुलकर्णी यांनी मागील 31 वर्षांपासून माध्यम क्षेत्रातील विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. त्यांनी माध्यम क्षेत्रातील पदवीसह विधी (संविधान), व्यवस्थापन विषयात पदवी प्राप्त केली आहे. सध्या दैनिक पुण्यनगरीच्या विदर्भ आवृत्तीचे संपादक म्हणून श्री. कुलकर्णी कार्यरत आहेत.